रस्त्याच्या नुतनीकरणात सदोष मोजमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:07 PM2018-12-24T22:07:16+5:302018-12-24T22:07:39+5:30
अत्यंत वर्दळीचा असलेल्या खांबतलाव चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्याच्या नुतनीकरण कामात रस्त्याची सदोष मोजमाप केली जात आहे. आधीच या रस्त्याच्या नुतनीकरणाला सतराशे साठ विघ्न येत असताना प्रशासकीय चुकीमुळेच येथील नागरिकांना भविष्यात जीवाला मुकावे लागणार काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्ता बांधकामाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अत्यंत वर्दळीचा असलेल्या खांबतलाव चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्याच्या नुतनीकरण कामात रस्त्याची सदोष मोजमाप केली जात आहे. आधीच या रस्त्याच्या नुतनीकरणाला सतराशे साठ विघ्न येत असताना प्रशासकीय चुकीमुळेच येथील नागरिकांना भविष्यात जीवाला मुकावे लागणार काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्ता बांधकामाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जवळपास दीड महिन्यांपुर्वी राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. मात्र आठवडाभरातच एनओसीचा मुद्दा समोर करीत पालिकेने बांधकाम थांबविले. त्यातही राजकीय व प्रशासकीय पेच प्रसंगात प्रशासनाच्या निर्देशानंतर आणन-फाणनमध्ये खोदण्यात आलेला रस्ता पुर्वीप्रमाणे मुरूम व चुरी टाकून समतल करण्यात आला. मागील पंधरा दिवसांपासून अशीच स्थिती असून धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दुसरीकडे याच कालावधीत संबंधित यंत्रणेमार्फत रस्त्याचे मोजमाप करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या मोजणीत दुजाभाव होत असल्याचा स्पष्ट आरोप येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर रस्त्याचे नुतनीकरण करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयामार्फत आली आहे. ते करताना दोन-तीनवेळा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी मोजणी करत होते. त्यावेळेला कधी पाच फूट तर कधी दहा फुट आतमध्ये तर कधी सुरक्षा भिंतीपर्यंत मार्किंग करण्यात आली. आता तर या मार्गावरील घरांच्या भिंतीवर वेगवेगळे मार्किंग दिसत आहे. १९९२-९३ च्या नकाशाच्या आधारावर ही मोजणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्या कालावधीच्या प्रकाशनात त्रृटी असल्यामुळे त्यावर्षाचे प्रकाशन रद्द करण्यात आले होते. भूमिअभिलेख कार्यालयातील मागील बंदोबस्ताचा नकाशा १:४००० या स्केलप्रमाणे आहे. परंतु १९९२-९३ चा नकाशा १:५००० स्केलप्रमाणे आहे.
भंडारा खास व पिंगलाई तसेच केसलवाडा येथे रेल्वे फाटकाजवळ शिवधुरा आहे. हे एका खाजगी ले-आऊटमध्ये स्पष्टपणे नोंद असतानाही सन १९९२-९३ च्या बंदोबस्त नकाशात शिवधुरा नाही. विद्यमान स्थितीत होत असलेली मोजणी अत्यंत चुकीची असून नझूलच्या नालीच्या जागेनंतरही मोजणी केली जात आहे. या पूर्ण प्रकरणात मोजमाप करताना दुजाभाव होत असून राजीव गांधी चौकापासून ते जिल्हा परिषद चौकाकडे जाणाºया डावीकडील भाग जास्त तर उजवीकडील भाग कमी प्रमाणात मोजला जात असल्याची ओरड आहे.
रस्त्याच्या मध्यभागातून मोजणी करणे आवश्यक असताना रस्त्याचा मध्यबिंदूच बदलविण्यात येत आहे, ही अत्यंत निंदनिय बाब असल्याचेही नागरिकांची म्हणणे आहे. सदर रस्त्याच्या नूतनीकरणापुर्वी भविष्यात नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, ही बाब लक्षात घ्यावी, अशी मुख्य मागणी आहे.