ओव्हरलोडिंग वाहनांमुळे रस्त्याचे विद्रुपीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:40+5:302021-03-17T04:35:40+5:30
तुमसर : वाहनांच्या ओव्हरलोडिंगमुळे शहर ते ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली संपूर्ण रस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहेत, तर ...
तुमसर : वाहनांच्या ओव्हरलोडिंगमुळे शहर ते ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली संपूर्ण रस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहेत, तर दुसरीकडे वाहतूक चालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असताना मात्र, विकसित झालेल्या पॉकेट संस्कृतीमुळे वाहतूक व आरटीओ विभागही या वाहनांवर कारवाई करण्यासाठी धजावत नाही. परिणामी, अवजड वाहन चालक आणि मालकांचे हौसले बुलंद झाले आहेत.
तुमसर तालुक्यात आशिया खंडातील सुप्रसिद्ध अशा मॅग्निज चिखला व डोंगरी बुज येथे आहेत. त्याचबरोबर, बावनथडी व वैनगंगा नदी पात्रातील सुपीक रेतीचे माहेरघर म्हणून तालुक्याला वरदान मिळाले आहे. परिणामी, तुमसर शहर व ग्रामीण भागातून ओव्हरलोड ट्रकांची वर्दळ नेहमीच पाहावयास मिळत आहे. शहरातील चौकांवर व इतर ठिकाणी आरटीओ व वाहतूक पोलीस छोट्या वाहनांवर कारवाई करताना दिसत आहेत, परंतु समोरून मालवाहू अवजड वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल लादून जात असले, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. वाहन चालकांचा वाहतुकीच्या नियमांशी काही संबंध नाही, ते अनियंत्रितपणे माल लोड करतात आणि गंतव्य स्थानाकडे निघतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शाळा सुटण्याच्या वेळी, रस्त्यावरून मुलांचे बाहेर पडणे, दुचाकी चालकांचे गाडी चालवणे व वयोवृद्ध लोकांचे धोक्याचे झाले आहे. ओव्हरलोड वाहनामुळे रस्त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. खराब रस्त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत, याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, तक्रारीकडे लक्ष दिले गेले नाही. परिणामी, सर्वसामान्यांना त्रासाचे जीवन लागत आहे.
कोट:
रस्त्यावरून ४० ते ५० टन गौणखनिजाची अवजड वाहनातून कित्येक वर्षापासून वाहतूक होत असल्याने, या रस्त्याची क्षमता आधिक प्रमाणात अधिभार पेलण्याची नसल्याने हजारो कोटींचा निधी खर्च झालेल्या रस्त्याचा भुगा झाला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने अवजड वाहनांवर कारवाई करावी.
गौरीशंकर मोटघरे, जिल्हा महासचिव काँग्रेस