राज्य मार्गावरील अतिक्रमण हटवा
By admin | Published: September 30, 2016 12:43 AM2016-09-30T00:43:57+5:302016-09-30T00:43:57+5:30
कोंढा कोसरा मेनरोडवर नेहमी अपघात होत असतात. याला मुख्य कारण येथे वाढलेले अतिक्रमण आहे.
कोंढा येथे अपघातानंतरचे पडसाद : नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
कोंढा (कोसरा) : कोंढा कोसरा मेनरोडवर नेहमी अपघात होत असतात. याला मुख्य कारण येथे वाढलेले अतिक्रमण आहे. राज्य मार्गाच्या दोन्ही बाजुला व्यापारी, दुकानदार यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच लहानमोठे हातठेलेवाले दिवसभर दुकान थाटून बसतात. त्यामुळे ते अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
२८ सप्टेंबरला बोलेरू मिनीडोर गाडीने स्वाती केवळराम मैदळकर या मुलील चिरडले त्यामुळे तिचा मृत्यू झाला. गांधी ज्युनिअर कॉलेजचे सकाळपाळीचे वर्ग ११.३० वाजता सुटतात. त्यावेळी मेनरोडवर प्रचंड गर्दी असते. तसेच दररोज दुपारी ५ वाजता देखिल वर्ग ५ ते १० चे वर्ग सुटल्यानंतर मेनरोडवर प्रचंड गर्दी असते. अशावेळी कोंढा येथे नेहमीसाठी वाहतूक पोलीस मेनरोडवर राहणे आवश्यक आहे.
राज्यमार्गावर बसस्टँडपासून बेलाटी रोडपर्यंत आजुबाजुला लहान मोठ्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. वाहनधारक देखिल आजुबाजुला वाहन उभे ठेवून इकडे तिकडे भटकत असतात. तसेच खरेदीदार दुकानाच्या समोर मोटारसायकल, सायकल उभी करून सामान खरेदी करीत असतात म्हणून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे अपघताचे प्रमाण वाढले आहे. आठवडी बाजाराच्या दिवसी लोकांची प्रचंड वर्दळ येथे असते. अशावेळी दिवसभर एक पोलीस कर्मचारी येथे असणे आवश्यक आहे. पण तो कर्मचारी बाजारात चारचाकी वाहनधारकाकडून हप्ता वसूल करण्यात व्यस्त असते. त्यामुळे इकडे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
कोंढा येथील वाहतूक समस्याअजून किती जणाचा बळी घेणार असा प्रश्न अनेक लोक विचारीत आहेत. (वार्ताहर)