कामगारांना किचन सेटचे वितरण अडकले; नोंदणी व नूतनीकरणही थांबले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 02:24 PM2024-11-05T14:24:48+5:302024-11-05T14:26:08+5:30
आचारसंहितेचा फटका : निवडणूक आटोपण्याची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत कामगार म्हणून नोंदणी करणाऱ्या कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी नोंदणी व नूतनीकरणाचे काम सुरू होते. तसेच कामगार किटचे वितरणही सुरू होते. परंतु आचारसंहिता सुरू झाल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे कामगारांना नवीन सरकार सत्तारूढ होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत वर्षभर नोंदणी व नूतनीकरणाची मोहीम सुरू असते. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नवीन नोंदणी व नूतनीकरण तसेच लाभ वितरणाचीही प्रक्रिया थांबवलेली आहे. इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगारांनी नोंदणी केल्यास त्यांना संरक्षक किटसह विविध साहित्याचा लाभ दिला जातो. हा लाभ मिळावा यासाठी कामगार नोंदणी करतात. परंतु, सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे.
महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा
जिल्ह्यात आचारसंहिता लागू होईपर्यंत सक्रिय कामगारांना किचन संच वितरणाचे काम हाती घेण्यात आले होते. काही कामगारांना किट संचचे वितरण करण्यात आले. बहुतांश मजूर अद्यापही किचन संच लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. हे किचन संच केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा मजुरांना आहे. किचन संचामध्ये विविध प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. आता निवडणूक संपेपर्यंत म्हणजे साधारणतः महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
३० हजारांवर सक्रिय कामगार
जिल्ह्यात ३० हजारांवर सक्रिय कामगार आहेत. हे कामगार दरवर्षी नूतनीकरण करतात. कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभसुद्धा दिला जातो.
कामगारांना असे मिळतात लाभ
सामाजिक सुरक्षा
पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी ३० हजार रुपये, मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण आदी आदी सामाजिक सुरक्षेच्या योजना राबविल्या जातात. सदर योजनांचा लाभ पात्र कामगारांना दिला जातो.
शैक्षणिक सुविधा
इयत्ता पहिली ते सातच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष दोन हजार ५००, तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५ हजार रुपये. इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १० हजार रुपये. वैद्यकीय पदवी- करिता प्रतिवर्षी १ लाख रुपये. अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी ६० हजार रुपये.
आरोग्यविषयक
नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार रुपये, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २० हजार रुपये, गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियो जनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत ठेव. ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये. तसेच आरोग्य योजनेचा लाभ मिळतो.