कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:58+5:302021-05-03T04:29:58+5:30
आमगाव : रेल्वे स्टेशन ते लांजी रोड वाघ नदीपर्यंत रस्ता व नाली बांधकाम सुरू आहे. मात्र, नाली बांधकामात संबंधित ...
आमगाव : रेल्वे स्टेशन ते लांजी रोड वाघ नदीपर्यंत रस्ता व नाली बांधकाम सुरू आहे. मात्र, नाली बांधकामात संबंधित कंत्राटदार अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत आहे. यामुळे नालीवरील स्लॅबला भेगा पडल्या आहेत. या बाबीची दखल घेत व्यावसायिक व नागरिकांनी याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली तसेच हा प्रकार वृत्तपत्राच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणण्यात आला. वृत्त प्रकाशित होताच यासंदर्भात प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत तहसीलदारांना निवेदन दिले.
शहरातील रस्ते, नाली बांधकाम शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. कंत्राट कंपनीच्या वतीने हे काम करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. परंतु हे कंत्राटदार बांधकामाची वाट लावत आहेत, असा प्रकार रेल्वे स्टेशन ते लांजी रोड वाघ नदीपर्यंत रस्ता व नाली बांधकामादरम्यान सुरू आहे. रस्त्यालगतच नालीचे बांधकाम करून स्लॅब टाकण्यात आली. परंतु स्लॅबला भेगा पडल्या. यामुळे या कामात निकृष्ट साहित्याचा वापर केला जात असल्याचे चव्हाट्यावर आले. यासंदर्भात व्यावसायिक व नागरिकांनी आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली तसेच ही बाब वृत्तपत्राच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणली. बातमी प्रकाशित होताच या प्रकरणाची प्रहार संघटनेने दखल घेत तहसीलदारांना निवेदन दिले.
रस्ता व नाली बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून, पूर्ण झालेल्या नालीला पाण्याची आवश्यकता असूनही पाणी दिले जात नाही. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून तातडीने नाली दुरुस्त करण्यात यावी. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. शिष्टमंडळात प्रहार संघटना तालुकाप्रमुख सुमित गिरडकर, मनोज हत्तीमारे, नीलेश जांभुळकर, चंदू बडवाईक, गौरी गिरडकर, गिरीश लिल्हारे उपस्थित होते.