कंत्रादारावर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:33+5:302021-05-06T04:37:33+5:30
आमगाव : नगर परिषदअंतर्गत येणाऱ्या बनगाव येथील संत गाडगेबाबा नगरात खडीकरणानंतर लगेच सिमेंट काँक्रीट रस्ता कामठा ...
आमगाव : नगर परिषदअंतर्गत येणाऱ्या बनगाव येथील संत गाडगेबाबा नगरात खडीकरणानंतर लगेच सिमेंट काँक्रीट रस्ता कामठा रोड ते माल्ही मार्गे तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी शासनाने खर्च केला; पण कंत्राटदार यांनी रस्त्याच्या दुतर्फा मुरूम न टाकल्याने या ठिकाणी दैनिक अपघात होतात. त्यामुळे याला दोषी असणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
हा रस्ता तयार होऊन अनेक महिने लोटले तरीसुद्धा अंदाजपत्रकानुसार रस्त्याच्या दुतर्फा बाजूला मुरूम टाकण्यात आले नाही. तसेच स्वावलंबन नगरात हीच परिस्थिती आहे. या रस्त्यावरून शंभुटोला, महारीटोला, माल्ही, श्रावनटोली या गावांतील नागरिक ये-जा करीत असतात, म्हणून नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. परंतु, सायडिंगला मुरूम न टाकण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प. बांधकाम विभाग, नगर परिषद, लघु पाटबंधारे विभाग, आदी विभागांतील अभियंत्यांवर वरिष्ठांचे नियंत्रण नसते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राजीव फुंडे, जगदीश मेश्राम, पाथोडे, मुकेश मेंढे, अजय दोनोंडे, मुकेश शेंडे, मेश्राम, विजय वैरागडे, भुमेश्वर पाथोडे, वासू बावनकर, बाळू उईके यांनी केली आहे.