जिल्ह्यात एनपीडीडी प्रकल्पास मान्यता देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:35 AM2021-03-18T04:35:29+5:302021-03-18T04:35:29+5:30
केंद्रीय दुग्धविकासमंत्र्यांना निवेदन : खा.सुनील मेंढे यांनी घेतली भेट भंडारा : भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने महाराष्ट्र राज्य ...
केंद्रीय दुग्धविकासमंत्र्यांना निवेदन : खा.सुनील मेंढे यांनी घेतली भेट
भंडारा : भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मुंबई यांच्याकडे सादर केलेला डेअरी डेव्हलपमेंट फोर नॅशनल प्रोग्राम म्हणजेच डीपीडीडी प्रकल्पाला मान्यता देण्यात यावी, या मागणीला घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी आज केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धविकास मत्स्यव्यवसायमंत्री श्री.मा.गिरीराज सिंग यांची भेट घेतली. पूर्व विदर्भातील उत्पादन उद्योगाला नवी उभारी देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याचे खासदारांनी पटवून दिले.
सुरू असलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली येथे असलेल्या खासदारांनी आज केंद्रीय मंत्र्यांना भेटून जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विषय केंद्रीय मंत्र्यांपुढे मांडला. भंडारा जिल्हा महाराष्ट्र दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ५० हजार शेतकरी या व्यवसायात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे या शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. मात्र, मागील काही काळात कोरोना विरोधी राबविण्यात आलेल्या उपायांमुळे, बाजारपेठेतील परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे संघ अडचणीत आला. शेतकऱ्यांचे दुधाचे थकीत पैसे देणे संघाला अवघड झाले आहे. संघ पैसे देण्यास असमर्थ असल्याने, दूध उत्पादक अडचणीत आले आहेत.
अशा परिस्थितीत जिल्हा दूध संघाने डेअरी डेव्हलपमेंट नॅशनल प्रोग्राम या उपक्रमांतर्गत प्रस्ताव राज्याची अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ आकडे सादर केला आहे. संघाने सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाची छाननी होऊन सर्व निकषांवर खरा उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मान्यता देण्यात यावी. हा प्रकल्प आल्यास पूर्व विदर्भातील दुग्ध उत्पादनाला नवीन संजीवनी मिळेल, असे खासदार सुनील मेंढे यांनी या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांना सांगितले आहे.