सोने महागल्याने वाढली बेन्टेक्सची मागणी; वधुपित्यांचे लग्नाचे बजेट वाढले, लग्नसराईवर परिणाम
By युवराज गोमास | Published: May 12, 2023 04:25 PM2023-05-12T16:25:51+5:302023-05-12T16:26:35+5:30
सोन्याचे दागीने महागल्याने सर्वसामान्यांसाठी खरेदी आवाक्याबाहेरची झाली आहे.
भंडारा : लग्नसराईत सोने ६२,२०० रुपयावर पोहचले आहे. दिवाळीत ५० हजार रुपये प्रति तोळा भाव असलेले सोने आता १२ हजाराने वाढला आहे. यामुळे सोन्याची खरेदी कमी झाली असून बेन्टेक्स दागिन्यांची मागणी वाढली आहे.
सोन्याचे दागीने महागल्याने सर्वसामान्यांसाठी खरेदी आवाक्याबाहेरची झाली आहे. यंदा वधू पित्यांना सोने खरेदी करताना बराच आटापिटा करावा लागला. तळ हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना मुलीच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करणे कठीन झाले आहे. शेतकरी, शेतमजूर सोने खरेदीपासून दूर गेले आहेत. परिणामी बेन्टेक्सची दागीने वापरण्याकडे महिला व मुलींचा कल वाढला आहे.
सोन्याची बांगडी मिरविण्याची हौस अनेक महिलांना असते. परंतु सोने महागल्याने महिला आता बेन्टेक्सच्या १०० ते तीन हजार रुपयांच्या बांगड्या वापरल्या जात आहे.
सध्या बेन्टेक्सची अंगठी ५० ते ३०० रुपयापर्यंत विकली जात आहे. लग्न समारंभात मिरवताना किंवा प्रवास करताना दागिने चोरी जाण्याच्या भितीने अनेक महिला बेन्टेक्सचे २०० ते तीन हजार पर्यंतचे मंगळसूत्र वापरण्याला प्राधान्य देत आहेत. तसेच लग्न विवाह सोहळ्यांमध्ये अथवा मोठ्या कार्यक्रमांसाठी बाजारात बेन्टेक्सचे नेकलेस २०० ते चार हजारापर्यंत उपलब्ध झाले आहेत.
सोने महागल्याने शेतकरी, शेतमजूर, लघु व्यावसायीक व अन्य व्यवसायातील मजुर महिला व मुली बेन्टेक्सचे दागिने वापरताना दिसून येतात. स्वस्त आणि मस्त म्हणूनही या दागिन्यांना पहिली पसंती दिली जात आहे. - कविराज कुर्वे, सराफा व्यवसायीक