पथदिव्यांची वीज जोडणी त्वरित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:43+5:302021-06-29T04:23:43+5:30
आमगाव : वीज वितरण कंपनीकडून गावातील पथदिव्यांची वीज जोडणी कापली जात असल्याने रात्रीला गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले ...
आमगाव : वीज वितरण कंपनीकडून गावातील पथदिव्यांची वीज जोडणी कापली जात असल्याने रात्रीला गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशात पथदिव्यांची जोडणी त्वरित करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सरपंच सेवा संघाच्यावतीने पालकमंत्री नवाब मलिक यांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुका सरपंच सेवा संघाच्यावतीने गावातील पथदिव्यांची जोडणी आणि इतर विविध समस्यांसंदर्भात पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेत वीज महावितरणने कपात केलेली पथदिव्यांची जोडणी त्वरित करावी व थकीत वीज देयक राज्य सरकारने वहन करावे; तसेच मनरेगाच्या कुशल आणि अकुशल कामांची देयके जनतेला त्वरित देण्यात यावीत, संगणक ऑपरेटरला देण्यात येणारे मानधन हे वित्त आयोगातून न देता शासनाने ग्रामपंचायतीच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे यांना द्यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांचेमार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. तसेच पालकमंत्री नवाब मलिक आणि आमदार विनोद अग्रवाल यांनासुद्धा देण्यात आले. यावर येत्या पावसाळी अधिवेशनात तोडगा काढला जाईल, असे आश्वासन नामदार मलिक यांनी दिले आहे. शिष्टमंडळात सुनील ब्राम्हणकर, नरेंद्र शिवणकर, हंसराज चूटे, सुनंदा ऊके, सुनील खोब्रागडे, गोदावरी हत्तीमारे, प्रमिला चकोले, दुर्गेश पटले यांचा समावेश होता.