ग्रामरोजगार सेवकांना ५० लाखांचे सुरक्षा कवच प्रदान देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:44+5:302021-05-06T04:37:44+5:30
ग्रामीण भागात स्थानिक लोकांना काम मिळावे यासाठी रोजगार हमीद्वारे स्थानिक मजुरांना काम देण्यात येते. कोरोना काळात त्यांना त्यांची ...
ग्रामीण भागात स्थानिक लोकांना काम मिळावे यासाठी रोजगार हमीद्वारे स्थानिक मजुरांना काम देण्यात येते. कोरोना काळात त्यांना त्यांची रोजीरोटी निर्वाह व्हावी या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. याकरिता स्थानिक रोजगार सेवक इमानेइतबारे काम करीत असतात. दरम्यान, मागील महिन्यात काम करीत असताना एका रोजगार सेवकाचे कोरोना काळात निधन झाले. मात्र, रोजगार सेवकाला सुरक्षा कवच नसल्यामुळे त्यांचे सर्व कुटुंब सुरक्षा कवच यापासून वंचित झाले आहे. कोरोनाची बाधा होऊन काही प्रसंगी सेवा देणारे दगावत आहेत.
अशावेळी त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत होऊ नये यासाठी २४ मार्च २०२१ पासून १८० दिवसांपर्यंत त्यांना हे कवच मिळाले आहे. मात्र, या १८० दिवसांच्या विमा सुरक्षा कवचामध्ये ग्रामरोजगार सेवक व तांत्रिक कर्मचारी यांना योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांना विमा सुरक्षा कवच याचा लाभ देण्यात यावा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत प्रत्येक गावात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून अथक परिश्रम घेत असलेल्या ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक कर्मचारी यांना सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार नसेल तर ही एक शोकांतिका आहे.
याकरिता ग्राम रोजगार सेवक व तांत्रिक कर्मचारी यांनी सुरक्षा कवच देण्याची मागणी शासन दरबारी करण्यात आली आहे. शासनाने या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊन समस्या सोडविण्यात यावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे रोजगार सेवक संघटनेने म्हटले आहे.