परप्रांतात वाढली भंडाऱ्यातील भेंडीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 09:58 PM2019-03-12T21:58:01+5:302019-03-12T21:58:47+5:30
धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे. ३० ते ३२ रुपये किलो जाग्यावरूनच भेंडी विकली जात असून दररोज २५ टन भेंडी विविध प्रांतात निर्यात केली जात आहे.
शेतमालाला बाजारपेठेची समस्या सर्वत्र दिसून येते. शेतकऱ्यांच्या हाती मुबलक पीक आले की बाजारात भाव पडतात. भाजीपाला विक्रीत तर व्यापारी, एजंट शेतकऱ्यांची लुबाडणूकच करतात. यावर मात करण्यासाठी भंडारा येथील बंडू बारापात्रे यांनी बीटीबी खासगी सब्जीमंडीची सुविधा सुरु केली. शेतकºयांना या सब्जीमंडीचा चांगलाच लाभ होऊ लागला. शेकडो शेतकरी येथे आपला भाजीपाला घेऊन येतात.
अलीकडे शेतकरी भेंडी पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. लाखनी तालुक्यातील खेडेपारचे नारायण धरमशहारे, सोमलवाडाचे सुखदेव टिचकुले, पालांदुरचे बळीराम बागडे, सामेवाडाचे देवराव बोळणे, भंडारा तालुक्यातील बेटाळाचे बंडू ईश्वरकर, गडपेंढरीचे नाजूक गायधने आदी मोठ्या प्रमाणात भेंडीचे पीक घेत आहेत. बाजारात अपेक्षित भाव मिळत असल्याने ते येथील बीटीबी मार्केटमध्ये आपली भेंडी विक्रीसाठी आणतात. सध्या भेंडीला ३० ते ३२ रुपये भाव मिळत असल्याचे या शेतकºयांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील भेंडीला उत्तर प्रदेशातील बनारस, गोरखपूर, दमोह, मध्यप्रदेशातील जबलपूर, सागर, कटनी, शिवनी, छिंदवाडा, झांशी, टिकमगड, बिहारमधील पाटणा, छत्तीसगडमधील रायपूर, बिलासपूर, अंबीकापूर येथे मोठी मागणी आहे. येथून हा भेंडी विशिष्ट पद्धतीने पॅकींग करून पाठविला जातो. यासोबतच इतर भाजीपालाही परप्रांतात पाठविला जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील भाजीउत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. आज भंडारातील भेंडीसह इतर भाजीपाला परप्रांतात जात आहे. भंडाराची ओळख भातासोबत भाजीउत्पादक म्हणूनही होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी