बनगाव येथील रस्ता रुंदीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:46+5:302021-06-23T04:23:46+5:30
आमगाव : स्थानिक नहर रोड बनगाव येथील नहरावरून अंडरग्राउंड रस्ता तयार करण्यात यावा. या मागणीचे निवेदन खा. प्रफुल्ल पटेल ...
आमगाव : स्थानिक नहर रोड बनगाव येथील नहरावरून अंडरग्राउंड रस्ता तयार करण्यात यावा. या मागणीचे निवेदन खा. प्रफुल्ल पटेल यांना ते रविवारी आमगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता देण्यात आले.
नहर रोड बनगाव येथील रस्त्यावरून कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव येथे जाण्यासाठी ट्रक व इतर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्ता अरुंद झाल्यामुळे रहदारीसाठी अत्यंत धोकादायक झालेला आहे. तसेच या रस्त्याचा वापर कामठा रोडकडील पंधरा-वीस गावांतील नागरिक आमगाव येथील बाजारात ये-जा करण्यासाठी करतात. या रस्त्यावर शाळा व महाविद्यालयेसुद्धा आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते. आमगाव येथील बाजार समितीला जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता असल्यामुळे सर्व शेतकरी, व्यापारी याच रस्त्याचा वापर करतात. या चारशे मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण करून व रस्ता दुरुस्ती करून नहराला अंडरग्राउंड केल्यास बाजार समितीला जाण्यासाठी सोयीचे होईल. याबाबतचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना यापूर्वीच देण्यात आले आहे. खा. पटेल यांनी निवेदन स्वीकारत यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात बी.एम. कटरे, डॉ. विद्यालाल रहांगडाले, पत्रकार राजीव फुंडे, संजीव रावत, बी.डी. हत्तीमारे, एल.एम. खंडाईत, नरेंद्र बहेटवार, बडे महाराज, श्यामराव बावनथडे, टी.आर. वाडिवा, उमेश रहांगडाले, मंदार शिरसकर, गायत्री रावत, चेतना कटरे, नेहा रावत, चंद्रकांता रहांगडाले यांचा समावेश होता.