आधारभूत खरेदी केंद्रांवर मका खरेदी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:09+5:302021-04-12T04:33:09+5:30
दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन धान उत्पन्नात कमालीची घट निर्माण होत असते. त्यामुळे या परिसरातील ...
दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन धान उत्पन्नात कमालीची घट निर्माण होत असते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी धान पिकाला बगल देत धान पिकाचे लागवड क्षेत्र कमी करून त्या ठिकाणी उन्हाळी मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उन्हाळी मका पिकाची नुकतीच मळणी आटोपून मका पीक वाळत घातले आहे. मका पिकासाठी वातावरण चांगले असल्यामुळे मका पिकाचे उत्पन्न भरघोस आले. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी आनंदित असल्याचे दिसून येत आहे. मका पीक साठवणुकीच्या अभावामुळे शेतात पडले आहे. आधारभूत केंद्रांमधून मका पिकाला प्रतिक्विंटल १,८५० रुपये हमीभाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आधारभूत केंद्राने मका पीक खरेदी करण्याची वाट पाहत आहेत. खरीप हंगामातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान्य अजूनही महामंडळाच्या केंद्रावर पडून आहेत. जोपर्यंत धान्याची उचल होणार नाही, तोपर्यंत मका पीक खरेदी केले जाणार नाही, असा सूर महामंडळाकडून ऐकविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेले मका पीक खरेदी केले जाणार किंवा नाही अशी शेतकऱ्यांमध्ये शंकावजा भीती निर्माण झाली आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून मका विक्रीला प्रतिक्विंटल १,२०० ते १,३०० रुपयांपर्यंत भाव दिला जाईल. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर पडून असलेली धानाची उचल करून महामंडळाने मका पिकाची खरेदी त्वरित सुरू करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांसह दिनेश पाटील रहांगडाले यांनी केली आहे.