शिक्षकांच्या मागणीसाठी कुलूपबंद आंदोलन स्थगित
By admin | Published: July 9, 2016 12:39 AM2016-07-09T00:39:54+5:302016-07-09T00:39:54+5:30
शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे.
धानोरी शाळेतील प्रकार : जि.प. उपाध्यक्षांचे आश्वासन
पवनी : शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. धानोरी येथील शाळेत शिक्षकाच्या मागणीसाठी आज शुक्रवारला शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलनाला तुर्तास स्थगीती दिली.
जिल्हा व तालुकास्तरार शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. यात अनियमितता झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शाळांवर शिक्षकांची कमतरता दिसून येत आहे. तालुक्यातील धानोरी, कन्हाळगाव व चांदी (चन्नेवाडा) येथील इयत्ता पहिली ते ७ वी पर्यंतच्या वर्गांना केवळ दोन शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
धानोरी येथील उच्च प्राथमिक शाळेला पुरेशी पटसंख्या आहे. तरी देखील तालुकास्तरावरील बदलीने दोन पदवीधर व एका प्राथमिक शिक्षकाची बदली करण्यात यावी, त्यामुळे वर्ग ७ व शिक्षक मात्र एक अशी शाळेची अवस्था झाली आहे. कन्हाळगाव येथून एका शिक्षकाची प्रशासकीय बदली करून धानोरी येथे नियुक्ती केल्याने सात वर्गासाठी दोन शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी येथे शिक्षकांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी पालकांनी केली. मात्र त्यांच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी करून आज शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा यापूर्वी निवेदनातून दिलेला होता. एका पदविधर शिक्षकाची गरज असतानाही शिक्षण विभागाने त्यांची मागणी धुळखावून लावली आहे.
दरम्यान गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्याशी संपर्क साधला. यावर डोंगरे यांनी शाळेला लवकरच शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी कुलूपबंद ठोकण्याचा निर्णय तुर्तास मागे घेतला. यावेळी ईश्वर तिघरे, नरेश जुमळे, संदीप आवळे, देवकन्या बारसागडे, जासुंदा मंडपे, वनिता दिघोरे, शारदा वावधरे, विश्रांती घुटके, मारोती सतीबावने, रायभान तिघरे, नामदेव वाघधरे, व्यंकट मंडपे, लता शिंदे, भागवत नागपुरे, विजय खरकाळे, रायभान तिघरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)