दुष्काळग्रस्तांना कर्जमाफी देण्याची मागणी
By admin | Published: January 30, 2016 12:53 AM2016-01-30T00:53:52+5:302016-01-30T00:54:33+5:30
तालुक्यातील धोप व ताडगाव परिसरातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक झाले नसून या दोन्ही गावांची पैसेवारी २९ पैसे निघाली ...
तहसीलदारांना निवेदन : धोप, ताडगावासीयांची मागणी
मोहाडी : तालुक्यातील धोप व ताडगाव परिसरातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक झाले नसून या दोन्ही गावांची पैसेवारी २९ पैसे निघाली असल्याने येथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, तसेच सोरणा तलावात बावनथडी प्रकल्पाचा पाणी सोडण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत धोप व ग्रामवासी यांनी तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
धोप व ताडगाव जवळील सोरणा तलावात फक्त २० टक्के जलसाठा उपलब्ध होता. पाऊस न आल्यामुळे तसेच तलावात पाणी नसल्याने या दोन्ही गावातील शेतकऱ्यावंर नापिकीची पाळी आली. तसेच ज्यांचे थोडेफार पिक झाले होते त्यांचा किडीच्या प्रादुर्भावाने पूर्ण तनसीत रूपांतर झाले. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाच्या सर्व्हेक्षणाद्वारे या दोन्ही गावांची आणेवारी २० पैसे काढण्यात आली असून या दोन्ही गावांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे.
त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पुर्ण कर्जमाफी देण्यात यावी, वीज बिल माफ करण्यात यावे, नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच अशी परिस्थिती पुन्हा शेतकऱ्यावर येवू नये, यासाठी बावनथडी प्रकल्पाचा एक कालवा सोरणा तलावात जोडण्यात यावा व सोरणा तलावाची साठवण क्षमता वृद्धी करावी अशा मागण्या करण्यात आल्या असून मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून रास्ता रोको करण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना सरपंच मंगला पिकलमुंडे, कृष्णा पिंगरे, वर्षा नागलवाडे, केवलचंद कांबळे, नरेंद्र पिकलमुंडे, किरण अतकरी, प्रभु मोहतुरे, अरुण तितीरमारे, श्याम कांबळे, केशव बांते, चंगेज खान, दिलीप ढोसरे, गणेश पाटील, केवल कांबळे, निलकंठ गिरीपुंजे, राजेश शेंडे, संजय पाटील, रवि सपाटे, मणिराम निमकर, पुरूषोत्तम शेंडे, उरकुडा राखडे, गुड्डू बांते, संतोष उके, दुर्गा सपाटे, शारदा भोयर आदी गावकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)