आप्तेष्टांच्या आक्रोशाने हादरली स्मशानभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:57 AM2019-06-20T00:57:54+5:302019-06-20T00:58:31+5:30
कुंभलीजवळील अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनींचे मृतदेह मंगळवारी सासरा आणि सानगडी गावात पोहचले. मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्तेष्टांच्या आक्रोशाने स्मशानभूमीही अक्षरश: हादरली. पाच मृतदेहाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या होत्या.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : कुंभलीजवळील अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनींचे मृतदेह मंगळवारी सासरा आणि सानगडी गावात पोहचले. मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्तेष्टांच्या आक्रोशाने स्मशानभूमीही अक्षरश: हादरली. पाच मृतदेहाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या होत्या. लगतच्या दोन गावातील पाच जणांचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती. गावात कुणाच्याही घरची चूल पेटली नाही. कुटुुंबीय तर अपघाताच्या धक्क्यातून अद्यापही सावरले नाहीत.
उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवित साकोली येथे प्रवेशासाठी गेलेल्या चार विद्यार्थिनींसह सहा जणांचा अपघाती मृत्यू झाला. काळ बनून आलेली भरधाव काळीपिवळी चुलबंद नदीत कोसळली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. सानगडी येथील शीतल सुरेश राऊत आणि अश्विनी सुरेश राऊत या सख्ख्या बहिणी. शीतल सानगडीच्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून नुकतीच बारावी पास झाली. तिला ५४ टक्के मार्क मिळाले. साकोली येथे प्रवेशासाठी आपली मोठी बहिण अश्विनीसोबत ती आली होती. अश्विनी साकोलीतच बीए अंतीम वर्षाला शिकत होती. तर पायल ही सर्वात मोठी बहिण बीएससीच्या अंतिम वर्षाला आहे. तिनही बहिणी उच्चशिक्षण घेऊन आईवडीलांचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या दोन्ही बहिणीला काळाने हिरावून नेले. सुरेश राऊत हे अर्जुनी मोरगाव येथे वनमजूर म्हणून कामाला आहेत. त्यांना तीन मुली आहेत. शीतल आणि अश्विनीचा एकाच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मध्यरात्री १२.३० वाजता या दोघींचे मृतदेह घरी आणले, तेव्हा आईवडीलांचा आक्रोश आसमंत भेदून टाकत होता.
सासरा येथील शिल्पा श्रीरंग कावळे ही बीएससी अंतिम वर्षाची विद्यार्थी. तिची लहान बहिण डिंपल बारावीत ५५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. बहिणीच्या प्रवेशासाठी त्या दोघी साकोली आल्या होत्या. मात्र अपघातात शिल्पा ठार तर डिंपल गंभीर जखमी झाली. आईवडीलांना या दोनच मुली आहेत. वडील कपडे इस्त्री करून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. सानगडी येथील सुरेखा देवाजी कुंभरे ही अत्यंत विपरीत परिस्थितीत शिक्षण घेत बारावी पास झाली होती. उच्च शिक्षण घेण्याच्या इच्छेतून तीे साकोली येथे प्रवेशासाठी आली होती. मात्र तिच्यावरही काळाने झडप घातली. सुरेखाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून लहान भाऊ नवव्या वर्गात शिकत आहेत. वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढतात. या चारही विद्यार्थिनींचे मृतदेह गावात आले तेव्हा अख्खा गाव घरासमोर एकत्र झाला होता. आक्रोश, हुंदके आणि अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्धचा संताप दिसून येत होता. कुणाच्याही घरची चुल पेटली नाही.
अपघातात ठार झालेली अक्षिता उर्फ गुनगुन हितेशराव पालांदूरकर ही मुळची नागपुरची. आठव्या वर्गात शिकणाºया गुनगुनची आई निता गोंदिया पोलीस दलात शिपाई आहे. आपल्या दोन मुलींसह ती चिखला येथे वडील खेमराज कुकडे यांच्याकडे पाहुणपणासाठी जात होती. मात्र आईचा हात धरून बसलेल्या गुनगुनला बेसावध क्षणी काळाने हिरावून नेले.
अंत्यसंस्काराहून शारदा परतत होती घरी
कुंभलीजवळ झालेल्या अपघातात सानगडी येथील शारदा गजानन गोटेफोडे ही महिला ठार झाली. भंडारा येथे राहणारा तिच्या बहिणजावयाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ती भंडारात आली होती. अंत्यसंस्कार आटोपून गावी परत जात असताना तिच्यावर काळाने झडप घातली. दोन महिन्यापूर्वीच तिच्या मुलाचे लग्न झाले होते.
काळीपिवळी चालकाला अटक
पुलावरून कोसळलेली काळीपिवळी जीप दीक्षांत उर्फ गोलू अनिल शहारे (२४) रा.दिघोरी मोठी ता.लाखांदूर हा चालवित होता. पुलावर त्याचे नियंत्रण गेले आणि जीप चुलबंद नदीत कोसळली. त्याच वेळी दीक्षांतने उडी मारून आपला जीव वाचविला. अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी तो घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर दिघोरी पोलीस ठाण्यात त्याने आत्मसमर्पण केले. सदर जीप दिघोरी येथीलच अनिता बंडू हटवार यांच्या मालकीची आहे.