गोसेखुर्द धरणावर प्रकल्पग्रस्तांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 06:00 AM2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:30+5:30
दुपारपासूनच भंडारा व नागपूर जिल्ह्यातील पाथरी, मेंढा, अर्जुनी, चिचखेडा, गोसीखुर्द, नवेगाव, बोथली, गाडेघाट, आंभोरा आदी गावातील प्रकल्पग्रस्त येत होते. दुपारी २ वाजता सर्व प्रकल्पग्रस्त येताच त्यांनी घोषणा, नारेबाजी करून गोसीखुर्द धरणाचा परिसर दणानून सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : गोसीखुर्द धरणाच्या भूमिपुजनाला ३१ वर्ष होवूनही ना धरण पूर्ण झाले ना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटल्या. अशा कैचीत सापडलेल्या गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने धरणावर एकत्र येवून नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने आयोजित केलेल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधून घेतले.
दुपारपासूनच भंडारा व नागपूर जिल्ह्यातील पाथरी, मेंढा, अर्जुनी, चिचखेडा, गोसीखुर्द, नवेगाव, बोथली, गाडेघाट, आंभोरा आदी गावातील प्रकल्पग्रस्त येत होते. दुपारी २ वाजता सर्व प्रकल्पग्रस्त येताच त्यांनी घोषणा, नारेबाजी करून गोसीखुर्द धरणाचा परिसर दणानून सोडला. प्रकल्पग्रस्त युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे, मच्छीमार प्रकल्पग्रस्तांना धरणावर मासेमारीचा हक्क द्या, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे आदी घोषणा प्रकल्पग्रस्त देत होते. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या मांडल्या.
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, पुनर्वसन स्थळी मुलभूत सुविधा मिळाव्या, प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची साधने द्यावी, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अनेक कुटुंबांना दोन लाख ९० हजार रूपये वाटप केले नाही ते वाटप करावे, पाथरी व अनेक गावातील समस्या सोडवाव्या, धरणात मच्छीमार प्रकल्पग्रस्तांना मासेमारीचा हक्क मिळावा, भंडारा जिल्ह्यातील खापरी रेहपाडे व नागपूर जिल्ह्यातील टेकेपार, रूयाड आदी गावांचे पुनर्वसन व्हावे आदी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या होत्या.
आंदोलनस्थळी दोन तासाचे पवनीचे नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी येवून मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासनाच्या नावाने प्रकल्पग्रस्तांनी दिलेले मागण्यांचे निवेदन स्विकारून सरकारला पाठविण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन संपविले. आंदोलनाचे नेतृत्व संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी केले. आंदोलनात धर्मराज भुरे, दादा आगरे, समीक्षा गणवीर, रमेश भेंडारकर, सीताराम रेहपाडे, गुलाब मेश्राम, सोमेश्वर भुरे, झिबल गणवीर, नामदेव तितिरमारे, किशोर समरीत, माणिक गेडाम, विनोद शेंडे आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. पवनी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.