कोंढा येथे डेंग्यूचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:54 PM2019-05-08T21:54:48+5:302019-05-08T21:56:23+5:30

पवनी तालुक्यातील कोंढा येथे गत काही दिवसांपासून डेंग्यूचा प्रकोप वाढला असून आतापर्यंत गावात चार रुग्ण आढळून आले आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या नळाची पाईपलाईन फुटल्याने गावात डबके साचून आजार पसरत असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहेत.

Dengue outbreaks in Kondha | कोंढा येथे डेंग्यूचा प्रकोप

कोंढा येथे डेंग्यूचा प्रकोप

Next
ठळक मुद्देचार रुग्ण आढळले : नळयोजनेची पाईपलाईन फुटल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा येथे गत काही दिवसांपासून डेंग्यूचा प्रकोप वाढला असून आतापर्यंत गावात चार रुग्ण आढळून आले आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या नळाची पाईपलाईन फुटल्याने गावात डबके साचून आजार पसरत असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहेत. या डेंग्यूच्या प्रकोपाने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोंढा येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून येत आहे. समीर हरिभाऊ माकडे (१०) याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संबंधात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल बोरकर यांना विचारले असता त्यांनी कोंढा येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये डेंग्यूचे रुग्ण मिळत असल्याची माहिती दिली. गावात विशेषत: वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आशा वर्कर यांना घरोघरी पाठवून लहान मुलांची चौकशी करण्यास सांगितल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
कोंढा येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये लहान मुलांना तापाचे आजार वाढले आहेत. गावकरी ताप आल्यानंतर खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन जात आहे. तेथे उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यास भंडारा येथील बालरोग तज्ज्ञाकडे घेऊन जातात. त्यामुळे कोंढा येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती उशिरा मिळते. ज्ञानदेव कुर्झेकर यांच्या दोन बालकांना डेंग्यू सदृष आजार झाल्याचे भंडारा येथील एका बालरोग तज्ज्ञाने सांगितले तर मुरलीधर लिचडे यांच्या मुलीलाही डेंग्यूची लक्षणे असल्याचे सांगितले आहे. दरम्यान बुधवारी कोंढा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर लेपसे व डॉ.अतुल बोरकर यांनी डेंग्यू रुग्ण असलेल्या घरी जाऊन भेट दिली. ग्रामपंचायत पदाधिकाºयांना पत्र देऊन डबक्यावर फवारणी करण्यास सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासन उदासीन
डेंग्यू आजार इडीस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. मुख्यत: डबक्यात साचलेल्या पाण्यावर डास बसलेले असतात. सकाळी किंवा रात्री हे डास डंख मारतात. यांचा नायनाट करण्यासाठी साचलेल्या डबक्यात फवारणी करणे आवश्यक आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून कोंढाच्या वॉर्ड क्रमांक तीन मध्ये पाण्याची पाईप लाईन ठिकठिकाणी फुटली आहे. खड्ड्यात पाणी साचून तेथे डासांची पैदास झाली आहे. त्यावर कोणतीच फवारणी न केल्याने आजार बळावल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. कीटकनाशके फवारून डासांचा बंदोबस्त करावा तसेच फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोंढा आरोग्य केंद्रात तंत्रज्ञच नाही
कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६० गावे येतात. ६० हजार लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. परंतु येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे येथे रक्ताचे नमुने घेतल्यानंतर केव्हा रिपोर्ट मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ताप व इतर आजार झाल्यास नागरिक खासगी डॉक्टरांकडे धाव घेतात.

डेंग्यू रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णांच्या घरी भेट देऊन उपचार करण्यात येईल. ग्रामपंचायतीला पत्र देऊन फवारणी करण्यास सांगितले जाईल.
-डॉ.अतुल बोरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोंढा
दोन वर्षापासून वॉर्ड क्रमांक तीन मध्ये डबक्यात फवारणी झाली नाही. डेंग्यू आजार पसरण्यास ग्रामपंचायत जबाबदार आहे.
-ज्ञानदेव कुर्झेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य
वॉर्ड क्रमांक तीन मध्ये कीटकनाशकाची फवारणी केली जात आहे. गावकºयांनी देखील आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास पुढाकार घ्यावा. त्यामुळे आजार वाढणार नाही. विरोधकांचे आरोप निराधार आहेत.
-डॉ.नूतन कुर्झेकर, सरपंच कोंढा.

Web Title: Dengue outbreaks in Kondha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.