दंत चिकित्सा विभाग नावापुरताच
By admin | Published: January 4, 2016 12:32 AM2016-01-04T00:32:06+5:302016-01-04T00:32:06+5:30
येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दंत चिकित्सा विभागात आवश्यक साधनाचा अभाव तर आहेच, ..
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अप-डाऊन सुरुच
राहुल भुतांगे तुमसर
येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दंत चिकित्सा विभागात आवश्यक साधनाचा अभाव तर आहेच, उलट डॉक्टरांचाही पत्ताच लागत नाही. त्यामुळे उपचाराविना रुग्णांना परतावे लागत आहे. रुग्णात कमालीची नाराजी पसरली असून दंत चिकित्सा विभाग हा नावापुरताच आहे काय? असा संतप्त सवाल रुग्णांनी केला आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात गत दोन वर्षापुर्वीपासून दंत रोग चिकित्सा विभाग सुरु करण्यात आला. त्यानुसार जाहिरातीद्वारे डेन्टीस्टची भरती प्रक्रिया पार केली होती. तिथेही वरिष्ठांकडे ज्यांचे साठेलोटे जमले त्यानाच नियुक्त करण्यात आले. दरम्यान तुमसर शहरातील अनेक डेन्टिस्टनी अर्ज केले होते. त्यांचा पत्ता लागलाच नाही. नागपूर येथील डॉक्टर रिया जामगाडे यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून उपजिल्हा रुग्णालयात दंत रोग चिकित्सा विभाग सुरु करण्यात आला. परंतु ओपीडीच्या वेळी दंत रुग्णांना कधीकधीच सुरु दिसतो. बहुतांश वेळा दाराला कुलूपच लागले दिसते. डॉक्टरांची एखाद्या वेळेला गाडी सुटली की दवाखान्याला सुटी राहते, अशी या विभागाची व्यथा आहे. जर का एखादा दंत चिकित्सा विभाग सुरु राहिला तरी दंत रोगाचे रुग्ण ‘केसपेपर’ घेवून गेले असता त्या रुग्णाची मशिनद्वारे योग्य तपासणी करणे आवश्यक असतांना साध्या क्लिनिकप्रमाणे दातांची वरवर तपासणी करुन उपचारासाठी पुढील तारखा देण्यात येतात. किडलेले दात काढणे, दात साफ करणे आदी किरकोळ बाबीकरिता ही पुढील तारखा मिळणे हे समजण्यापलीकडचे आहे. या विभागात ‘अॅन्टीबायोटिक्स’ च्या गोळ्या वगळता दुसरा कोणताच औषधीसाठा नाही. एक एक्सरे मशीन विभागात असून फारसा उपयोग त्या मशिनचा होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे या विभागाचा उपयोग तरी काय ? असे रुग्णांचे म्हणणे आहे. याबाबद अनेकदा वरिष्ठांकडे रुग्णांनी तक्रारही केली. पंरतु त्यावर अजूनही कोणतीही सुधारणा झाली नाही. दररोज येणारे दंतरोगाचे रुग्णांना आल्यापावली परतावे लागत असल्याने रुग्णांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.