कृषी विभाग खिळखिळा; खरिपाच्या तोंडावर ४७ टक्के जागा रिक्त
By युवराज गोमास | Published: May 17, 2024 03:28 PM2024-05-17T15:28:48+5:302024-05-17T15:30:07+5:30
प्रभारींवर सुरू आहे कामकाज : ४३५ पैकी २०४ जागा रिक्त
भंडारा : खरीप हंगाम २०२४-२५ ला प्रारंभ झाला आहे. शेतकरी मान्सूनपूर्व शेतशिवारातील कामे आटोपण्याच्या तयारी आहे. परंतु, ज्या विभागावर शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याची तसे मार्गदर्शन करण्याची जबाबदार आहे, तो कृषी विभाग रिक्त पदांमुळे खिळखिळा झाला आहे. जिल्ह्यात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत मंजूर पदांची संख्या ४३५ आहे. त्यापैकी २३१ जागा भरलेल्या असून २०४ जागा रिक्त आहेत. यामध्ये जिल्हा, तालुका व मंडळ पातळीवरील ४७ टक्के रिक्त पदांचा समावेश आहे. पर्याप्त मनुष्यबळाअभावी प्रभारींवर कामकाज सुरू आहे.
भंडारा जिल्हा कृषीप्रधान आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार शेती क्षेत्रातून होत असते. शेती क्षेत्रातून जवळपास १२ महिने काम उपलब्ध होतात. त्यातच शेती व शेतकरी संबंधीत शासनाच्या सर्व योजना कृषी विभागामार्फत राबविल्या जातात. कृषी विभाग शासन व शेतकरी यांच्यातील दूवा म्हणून महत्वाची यंत्रणा आहे. परंतु, या यंत्रणेकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे. परिणामी खरिपात विविध पिकांची लागवड, बि-बीयाणे, खते, किटकनाशके, तसेच माती परिक्षण, शेतशिवार मशागतीचे तंत्र आदींसाठी वेळेत मार्गदर्शन मिळत नाही. रिक्त पदांच्या सुळसुळाटाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण प्राप्त होताना दिसत नाही. शिवाय प्रभारांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण वाढतो आहे.
नव्या बदलापासून शेतकरी अनभिन्न
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कृषी क्षेत्रातील नवे बदल व तंत्रज्ञानातील बदलापासून अनभिन्न आहेत. त्यामुळे वर्षांनुवर्षाची पारंपारिक पद्धतीची शेती आजही कायम आहे. यासाठी कृषी विभागातील रिक्त पदांचा अनुशेष कारणीभूत ठरत आहे.
गट 'अ' अधिकाऱ्यांची ५ पैकी ३ पदे रिक्त
जिल्ह्यात गट अ अंतर्गत असलेले कृषी उपसंचालक तसेच उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. तर कृषी विकास अधिकाऱ्याचे पदही भरलेले नाही. एकंदर जिल्ह्यात गट अ अंतर्गत ५ पदे मंजूर असताना केवळ दोन पदे भरलेली असून ३ पदे रिक्त आहेत.
गट 'ब' अधिकाऱ्यांची ४२ पैकी १६ पदे रिक्त
जिल्ह्यात ब अंतर्गत एकूण ४२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २६ पदे भरलेली असून १६ पदे रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांची ७ पदे मंजूर असताना केवळ १ पद भरलेले असून ६ पदे रिक्त आहेत. तंत्र अधिकाऱ्यांची ६ पदे मंजूर असताना ३ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेतील सर्व ३ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ कृषी अधिकाऱ्यांची ११ पदे मंजूर असताना २ पदे रिक्त आहेत. लेखा अधिकारी व सहायक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे.
गट 'क' अंतर्गत ३१८ पैकी १३२ पदे रिक्त
गट 'क' अंतर्गत ३१८ पदे मंजूर असताना १८६ पदे भरलेली आहेत तर १३२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये कृषी पर्यवेक्षक ८, कृषी सहायक ७०, लघुलेखक १, लघुटंकलेखक १, वरिष्ठ लिपिक १, कनिष्ठ लिपीक ५, आरेखक १, अनुरेखक ३४, वाहन चालक ११ आदींचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा घटक असलेल्या कृषी सहायकाची मंजूर पदसंख्या १६४ असताना केवळ ९४ पदे भरलेली आहेत.
गट 'ड' अंतर्गत ७० पैकी ५३ पदे रिक्त
जिल्ह्यात गट ड अंतर्गत ७० पदे मंजूर असताना १७ पदे भरलेली असून ५३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये रोपमळा मदतनिस ६, गट 'ड' ची ४१, मजूर ६ आदींचा समावेश आहे.
रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढतो. परंतु, प्रभार सोपवून कामे करावी लागतात. लवकरच कृषी उपसंचालकाचे पद भरले जाणार आहे. तर अन्य पदे शासकीय भरतीनंतर भरली जाणार आहेत.
- संगिता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.