सामाजिक वनीकरण विभागाचे वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:30 AM2021-05-03T04:30:09+5:302021-05-03T04:30:09+5:30
लाखांदूर : गत काही वर्षात लाखांदूर तालुक्यात शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागांतर्गत अनेक रस्त्यांच्या दुतर्फा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली ...
लाखांदूर : गत काही वर्षात लाखांदूर तालुक्यात शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागांतर्गत अनेक रस्त्यांच्या दुतर्फा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र सदर विभागांतर्गत वृक्ष संवर्धनाकड़े हेतुपुरस्पर दुर्लक्ष होऊन रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांना गवती झुडुपांचा वेढा दिसून येत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊनही संवर्धनासाठी मात्र प्रयत्न होताना दिसत नाहीत. शासनाच्या विविध योजना वनविभागांतर्गत वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आल्या. गत काही वर्षात शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गतदेखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत क्षेत्रात शासनाच्या मग्रारोहयोअंतर्गतदेखील वृक्षलागवड करण्यात आली आहे. दरम्यान, शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागांतर्गत तालुक्यातील विशेषत: चौरास क्षेत्रातील काही गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या वृक्ष लागवडीअंतर्गत काही प्रमाणातील वृक्ष आवश्यक संगोपनाअभावी नष्ट झाल्याची तक्रार आहे. अनेक वृक्षांचे संवर्धन केले जात नसल्याने जिवंत वृक्षांना गवती झुडुपांचा वेढा होऊन नष्ट होण्याची भीती नागरिकांत व्यक्त केली जात आहे. दरम्यान वृक्ष लागवड, संगोपन व संवर्धन यासाठी शासनाचा नियमित कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी प्रशासकीय यंत्रनांच्या उदासीन धोरणाने वृक्षांच्या संवर्धनाअभावी अनेक वृक्ष नष्ट होण्याची भीती आहे.
बॉक्स
तालुक्यात सामाजिक वनीकरण कार्यालयच नाही
शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागांतर्गत नियमित वृक्ष लागवड केली जात असताना तालुक्यात या विभागाचे कार्यालय अस्तित्वात नसल्याने या विभागांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, विविध योजनांपासून वंचित ठरल्याचा आरोप केला जात आहे. शासनाने वृक्ष लागवडीसह अन्य विविध योजनांच्या लाभासाठी तालुक्यात सामाजिक वनीकरण कार्यालयाची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे.