भंडारात उमेदवारीसाठी घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:33+5:30
नामांकनासाठी अवघे चार दिवस हातात असतांना भंडारा विधानसभा मतदार संघात अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारांची घोषणा केली नाही. इच्छुकांच्या हृदयांचे ठोके वाढत असून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये घमासान सुरु आहे. तर आघाडीत भंडाराची जागा पिरिपाच्या (कवाडे गट) वाट्याला जाण्याची चर्चा सुरु झाल्याने आघाडीतील इच्छुकांमध्ये कमालीचा संभ्रम पसरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नामांकनासाठी अवघे चार दिवस हातात असतांना भंडारा विधानसभा मतदार संघात अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारांची घोषणा केली नाही. इच्छुकांच्या हृदयांचे ठोके वाढत असून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये घमासान सुरु आहे. तर आघाडीत भंडाराची जागा पिरिपाच्या (कवाडे गट) वाट्याला जाण्याची चर्चा सुरु झाल्याने आघाडीतील इच्छुकांमध्ये कमालीचा संभ्रम पसरला आहे.
भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भंडारा आणि पवनी या दोन तालुक्याचा या मतदारसंघात समावेश आहे. सध्या हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. भाजपसह काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. तर युतीचे अद्यापही तळ्यात-मळ्यात असल्याने ही जागा कुणाच्या वाट्याला जाते, याची उत्सुकता आहे. आता नामांकनाला प्रारंभ झाला आहे. परंतु अद्यापही भाजपसह कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांमध्ये तिकीट मिळविण्यासाठी घमासान सुरु आहे. अनेकांनी मुंबई गाठली असून गॉडफादरच्या माध्यमातून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.
भाजपचे विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे यांच्यासह नगर परिषदेचे उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजप नेमकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकते, याची मतदारांसोबतच सर्वांना उत्सुकता लागली आहे. आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला भंडारा मतदार संघ असला तरी ऐन वेळेवर काँग्रेस की राष्टÑवादी रिंगणात उतरणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्यासह राजकपूर राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीतर्फे चेतक डोंगरे आणि नितीन तुमाने इच्छुक आहेत.
युतीचे अद्यापही निश्चित झाले नाही. भंडाराची जागा कुणाच्या वाट्याला जाणार हा संभ्रम कायम आहे. २००९ मध्ये युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे शिवसेना सुरुवातीपासून भंडाराच्या जागेवर दावा करीत आहे. मात्र विद्यमान आमदार भाजपचे असल्याने भाजप ही जागा सोडणार काय? यावर तर्कवितर्क लावले जात आहे. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर या मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक आहे. भाजपच्या वाट्याला ही जागा गेल्यास ते कोणती भुमिका घेतात हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापले असले तरी उमेदवारांच्या नावाची अनिश्चितता आहे. येत्या दोन दिवसात उमेदवारांची नावे पुढे येतील आणि त्यानंतर निवडणुकीला रंगत चढेल.
आघाडीत भंडारा कुणाच्या वाट्याला
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला भंडारा मतदारसंघ आघाडीत कुणाच्या वाट्याला जाणार यावरुन आता विविध चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतर्फे इच्छुकांनी तयारी चालविली असताना आता ही जागा आघाडीत पिरिपाच्या कवाडे गटाला जाणार असल्याची चर्चा रविवारपासून सुरु झाली. जोगेंद्र कवाडे यांचे सुपूत्र जयदिप कवाडे यांना तिकीट मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा रविवारी शहरात होती. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. ऐनवेळेवर पिरिपा कवाडे गटाला तिकीट मिळाल्यास काँग्रेस- राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.