भंडाराच्या घटनेची राज्यात यापुढे पुनरावृत्ती होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:31 AM2021-01-13T05:31:48+5:302021-01-13T05:31:48+5:30
भंडारा जिल्हा रुग्णालयात शनिवारी निष्पाप दहा बालकांचा आगीत होरपळून जीव गेला. रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा ...
भंडारा जिल्हा रुग्णालयात शनिवारी निष्पाप दहा बालकांचा आगीत होरपळून जीव गेला. रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेष नवजात अतिदक्षता कक्षाची पाहणी केली. तसेच बचावलेल्या सात बालकांच्या उपचाराची माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे पीरिपाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार सेवक वाघाये, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ही घटना नेमकी कशामुळे घडली, उपकरण किंवा अनियंत्रित व्यवस्था, या आशयाच्या तक्रारी आल्या होत्या काय, याबाबतही शहानिशा केली जाणार आहे. कोरोनामुळे आरोग्य विभाग तणावाखाली आहे. या कामामुळेही त्या बाबीकडे दुर्लक्ष झाले काय, हेही तपासले जाणार आहे. आगीचे नेमके कारण काय? याचा प्रथमदर्शनी तपास केला जाणार आहे. घटना घडल्यानंतर काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या आहेत. त्यातून बोध घेऊन यापुढे एकही जीव जाऊ देणार नाही या निश्चयाने आम्ही काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चौकशी समितीला त्यांचे काम करू द्या असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दुर्घटनेचे नेमके कारण कळेल तेव्हाच अन्य प्रश्नांची उत्तरही आपोआप मिळतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बॉक्स
फायर ऑडिटच्या स्पष्ट सूचना
भंडारा जिल्हा रुग्णालयात शनिवारी पहाटेच्या सुमारास अग्नितांडवात दहा निरागस चिमुकल्यांचा बळी गेला. ही घटना नेमकी कशी घडली यामागचे तांत्रिक कारण काय याबाबतची संपूर्ण तपासणी सहा सदस्य असलेली चौकशी समिती करणार आहेत. फायर आणि सेफ्टी यासंदर्भात राज्यभरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे किंवा नाही याची चाचपणीही करण्याचे आदेश दिले आहेत. जिथे ऑडिट झाले असेल तरीही पुन्हा ऑडिट करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.