नायब तहसीलदाराने सिनेस्टाईल रेतीचा ट्रॅक्टर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:55+5:302021-06-19T04:23:55+5:30
ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६-२१३२ आहे. तहसीलदारांनी पकडलेला ट्रॅक्टर बारव्हा येथील लाडे नामक व्यक्तीच्या नावे असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मागील ...
ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६-२१३२ आहे. तहसीलदारांनी पकडलेला ट्रॅक्टर बारव्हा येथील लाडे नामक व्यक्तीच्या नावे असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मागील कित्येक दिवसांपासून बारव्हा परिसरातील मरेगाव, खोलमारा, तई, मरिमाय घाट, धर्मापुरी, बोथली व अन्य ठिकाणांवरून गौण खनिजांची रेती तस्करांकडून लयलूट सुरू आहे. हा खुलेआम चालणारा रेती तस्करीचा गोरखधंदा पोलीस विभाग व स्थानिक महसूल कर्मचारी यांचेच पाठबळाने सुरू असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. दिवसाढवळ्या खुलेआम रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. लाखांदूर येथील नायब तहसीलदार देवीदास पाथोडे यांनी दखल घेत रेतीचे ट्रॅक्टर पकडण्याची शक्कल लढविली. स्वतः पाथोडे हे ट्रॅक्टर मालकांच्या एजंटांचा डोळा चुकवित आडमार्गाने जाऊन खोलमारा मरेगाव रस्त्यावरील तलावाच्या पाळीवर दबा धरून बसले. इतक्यात सुसाट वेगाने रेती भरून धावत येत असलेल्या ट्रॅक्टरला अडवून ट्रॅक्टर थांबवत हायड्रोलिकचे पाईप त्वरित काढले. ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर अडविल्याची माहिती मिळताच लगबगीने येत ट्रॅक्टरचा ताबा मिळवित रेतीचा ट्रॅक्टर दामटण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान बाळगत तहसीलदार पाथोडे यांनी पुन्हा ट्रॅक्टरचा ताबा घेत पोलिसांना बोलाविले. ट्रॅक्टरवर स्वतः बसून रेतीचा ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केला.
बॉक्स
रेतीच्या चोरट्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवायचे आहे. पैसे घेऊन ट्रॅक्टर सोडण्यात येतात या नुसत्या पोकळ चर्चा आहेत. यापुढे ही असेच ट्रॅक्टर पकडून कारवाई करीत शासकीय मालमत्तेची लयलूट होऊ देण्यात येणार नाही.
देवीदास पाथोडे
नायब तहसीलदार लाखांदूर