लाखांदूर तालुक्यात नदी-नाले झाले वाळवंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:58 AM2019-05-15T00:58:42+5:302019-05-15T00:59:26+5:30
तालुक्यातून वाहणाऱ्या नदी-नाल्यात पाण्याचा एकही थेंब नसून नदीनाल्यांचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागते. माणसासोबतच जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.
दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातून वाहणाऱ्या नदी-नाल्यात पाण्याचा एकही थेंब नसून नदीनाल्यांचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागते. माणसासोबतच जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.
लाखांदूर तालुक्यातून चुलबंद, वैनगंगा या मोठ्या नद्यांसह अनेक नाले वाहतात. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे नदी - नाले आता कोरडे झाले आहे. विशाल पात्र असलेली वैनगंगाही कोरडी पडली आहे. चुलबंद नदीतही पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे नदीपात्र वाळवंटासारखे दिसत आहे. तालुक्यातील तलाव आणि बोड्यांनीही तळ गाठला आहे. ग्रामीण भागातील जलस्त्रोत झपाट्याने खाली जात आहे. परिणामी गावागावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी, बोअरवेल, हातपंप आदी जलस्त्रोत आटले आहे. अनेक ठिकाणी पाणी असले तरी गाळयुक्त आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी आबालवृद्ध पहाटेपासून भटकंती करतात. पाणीटंचाईचा फटका जनावरांनाही बसत आहे. अनेक गौपालक जनावरांच्या पाण्याची तजवीज करताना मेटाकुटीस आले आहे. गायी, म्हशी आदी जनावरे पाळावी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाढत्या तापमानाचा बसतोय फटका
लाखांदूर तालुक्यात तापमान प्रचंड वाढले आहे. सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जलस्त्रोत झपाट्याने खाली जात आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून नागरिकांना पाण्यासाठी प्रशासनाची विणवणी करावी लागत आहे