नोकरीत असूनही शिक्षक झाले बेरोजगार
By Admin | Published: June 2, 2017 12:26 AM2017-06-02T00:26:59+5:302017-06-02T00:26:59+5:30
जिल्हा परिषदेचा मुख्य प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर कधी हिरमुसल्या चेहऱ्याने बसून असतात तर कधी जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठ्या अपेक्षेने फेरफटका मारतात.
व्यथा आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांची : जि.प. मध्ये दररोजची पायपीट
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषदेचा मुख्य प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर कधी हिरमुसल्या चेहऱ्याने बसून असतात तर कधी जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठ्या अपेक्षेने फेरफटका मारतात. ही परिस्थिती आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांची. नोकरी असतानाही सुमारे ११७ शिक्षकांपैकी काही शिक्षकांची आता बेरोजगार झाल्यागत दैनावस्था झाली आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून आंतरजिल्हा प्रक्रियेतून ११७ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. मात्र या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान एका असंतुष्ट शिक्षकाच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी आंतरजिल्हा बदली रद्द केल्या होत्या. दरम्यान सहा शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे या सहा शिक्षकांना वगळून उर्वरीत १११ बदल्या रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हा परिषदेमध्ये धडकला. त्यानंतर १४ शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्याही प्रक्रियेला स्थगिती मिळाली. असे करता करता आता उर्वरितांपैकी अनेकांनी धाव घेतली आहे. असे असतानाही अनेक शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासन शिक्षक या नोकरीवर सामावून घेऊन अशी अपेक्षा आहे.
या अपेक्षेकरिता जिल्हा परिषदेमध्ये दररोज अनेक शिक्षक केविलवाण्या अवस्थेत येरझाऱ्या घालीत आहेत. मागील अनेक वर्षांपासून कुटुंबांपासून शेकडो कि.मी. अंतरावर नोकरी केल्यानंतर या बदल्यांमुळे ते कुटुंबाजवळ आले होते. मात्र प्रक्रिया रद्द झाल्याने त्यांचे अवसान गळाले आहे. अनेक शिक्षकांना रूजू झालेल्या शाळांमधील शिक्षकांकडूनच बोलणी ऐकावी लागल्याचे उदाहरणही समोर आले.
बदली प्रक्रिया रद्द होईल व या शिक्षकांना सामावून घेण्यात येईल या अपेक्षेने दररोज शिक्षक जिल्हा परिषदमध्ये येत आहेत. येथील शिक्षण विभागाचा एखादा अधिकारी किंवा कारकूनही भेटल्यास त्यांच्याकडे आपली व्यथा मांडीत आहेत. मात्र त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. दिवसभर जिल्हा परिषद मधील पायऱ्या चढून उतरून थकल्यानंतर अगदी नैराश्य यातील काही शिक्षक प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवरच बस्तान मांडून दररोज दिसतात. सध्या हे शिक्षक नोकरी असतानाही बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे कुटुंब आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रद्द झाल्यामुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अनेकांसमोर आर्थिक प्रश्न घोंघावत आहे. याकरिता अनेकांनी त्यांच्याकडे होते नव्हते ते सर्वस्वी पणाला लावून स्वगृही आले. मात्र प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या शिक्षकांना जबर फटका बसला आहे.