रेती तस्करांची नावे उघड होऊनही कारवाई शून्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:15+5:302021-07-05T04:22:15+5:30
टेंभरी विहिरगाव येथील प्रकरण लाखांदूर : टेंभरी विहिरगाव नदीघाटातून रेतीचा अवैध उपसा करून एका शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातील अवैध रेतीसाठा ...
टेंभरी विहिरगाव येथील प्रकरण
लाखांदूर : टेंभरी विहिरगाव नदीघाटातून रेतीचा अवैध उपसा करून एका शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातील अवैध रेतीसाठा तहसील प्रशासनाने जप्त केला होता. सदरप्रकरणी एका शेतमालकाने तालुक्यातील ४ रेती तस्करांची नावे तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाकडे तक्रारीसह दाखल केली. मात्र शेतकऱ्याच्या सदर तक्रारीकडे तहसील व पोलीस प्रशासनाअंतर्गत हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने रेती तस्करांची नावे उघड होऊनही कारवाईला तहसीलदारांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा जोरदार आरोप शेतकऱ्यांसह जनतेतून केला जात आहे.
माहितीनुसार, गत १५ जून रोजी लाखांदूर तालुक्यातील टेंभरी विहिरगाव नदीघाट परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातून लाखांदूर तहसीलदारांनी जवळपास १५० ब्रास अवैध रेतीसाठा पंचनामा करून जप्त केला होता. जप्त केलेल्या रेतीसाठ्याची रेती तस्करांकडून रात्रीच्या सुमारास चोरी होण्याच्या भीतीने तहसील प्रशासनाअंतर्गत तडकाफडकी उचल देखील करण्यात आली आहे. सदर कारवाईने धास्तावलेल्या विहिरगाव येथील एका शेतकऱ्याने सदर अवैध रेतीसाठाप्रकरणी तालुक्यातील चार रेती तस्करांविरोधात तहसील व पोलीस प्रशासनाकडे मागील १५ दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार तहसीलदारांनी संबंधित चारही रेती तस्करांना नोटीस बजावून बयाने नोंदविण्यात आली आहेत. पण तब्बल पंधरवडा लोटूनही लाखांदूर तहसीलदारांकडून शेतकऱ्याची तक्रार असताना देखील रेती तस्करांविरोधात कोणतीच कारवाई न करण्यात आल्याने शेतकऱ्यांसह जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गत काही महिन्यांपूर्वीपासून तालुक्यात खुलेआम रेती तस्करी सुरू असताना तहसील प्रशासनाकडून केवळ राजकीय दबावात रेती तस्करांविरोधात कोणतीच कारवाई केली जात नसल्याची ओरड आहे. तथापि तालुक्यातील टेंभरी विहिरगाव नदीघाट परिसरात कोट्यवधी रुपये किमतीचा अवैध रेतीसाठा पंचनामा करून जप्त करताना शेतकऱ्याने रेती तस्करांची नावे तक्रारीतून उघड केली असताना देखील लाखांदूर तहसीलदार केवळ राजकीय दबावापोटी संबंधितांच्याविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा जोरदार आरोप जनतेतून केला जात आहे.
शासनाने तात्काळ दखल घेऊन टेंभरी विहिरगाव नदीघाट परिसरात रेतीचा अवैध उपसा व साठाप्रकरणी शेतमालकाने तक्रारीद्वारे नावे उघड केलेल्या रेती तस्करांविरोधात दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यासह जनतेतून केली जात आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी तहसीलदारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.