पाचशे किलो मोहफुलांचा सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:39 AM2018-05-04T00:39:33+5:302018-05-04T00:39:33+5:30
कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मकरधोकडा, तिड्डी परिसरात नदी काठावर सुरू असलेल्या दारूच्या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली. या धाडीत सुमारे पाच लाख रूपयांचा पाचशे किलो मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मकरधोकडा, तिड्डी परिसरात नदी काठावर सुरू असलेल्या दारूच्या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली. या धाडीत सुमारे पाच लाख रूपयांचा पाचशे किलो मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला.
या धाडीत पोलिसांनी मोहाफुल सडवाचे प्लॉस्टिक ड्रम, प्लॉस्टीकचे पोते, मातीच्या माठांमध्ये भरलेली दारू, रबरी ट्युबमध्ये भरलेली दारू आणि दारु गाळण्याकरिता पाच लाखांचा ५०० किलो मोहाफुल सडवा, १० हजारांचे २० लोखंडी ड्रम, ३००० हजारांचे १५ प्लॉस्टीक ड्रम, ३५०० रूपयांचे दारु गाळण्याचे जर्मनी कटोरे, जळावू लाकडे, १० रबरी ट्युबमध्ये भरलेली दारु असा ६ लाख ६६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर हे सर्व साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आले. याचे चित्रकरणही करण्यात आले. वैनगंगा नदीकाठावर मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारु गाळण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु होते. परंतु ही कारवाई पहिल्यांदाच झाल्याचे दिसून आले आहे. ही कारवाई कारधा ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक लांडे, सुनिल राठोड, प्रविण राठोड, अजय कुकडे, सुनिल हुकरे, प्रविण खाडे, वसंत भुरे यांनी केली.
वैनगंगा नदीच्या पात्रापलिकडे दुर्गम स्थळी कुणी सहजासहजी येऊ शकत नाही किंवा कुणाच्याही नजरेस पडणार नाही. अशा ठिकाणी असलेल्या हा प्रकार सुरू होता. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कंकाळे हे अधिनिस्त पोलीस कर्मचाºयांना घेऊन एका डोंग््याच्या साहाय्याने नदीपात्र परिसर पिंजून काढला असता नदी पात्रातील वेगवेगळ्या ठिकाणी अवैध मोहाफुल दारूच्या भट्ट्या असल्याचे पोलिसांना आढळून आले.
सीमावर्ती भागात अवैध दारूविक्री
भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर तालुक्याला लागून दारुबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. या परिसरात वैनगंगा नदीचा किनारा मोठ्या प्रमाणात असून या भागात गाळली जाणारी मोहफुल आणि देशी दारु या दारुबंदी जिल्ह्यात तस्करी करण्यात येत आहे.
याशिवाय साकोली, लाखनी, लाखांदूर व पवनी या तालुक्यातील देशी दारुच्या भट्टीमधून दारुचा नियमित पुरवठा या दारुबंदी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मागील काही दिवसापूर्वी पवनी तालुक्यातील भावड येथील देशी दारुचे दुकान अधिक विक्रीमुळे बंद होते. त्यानंतर हे दुकान अनेक दिवस बंद राहिले. परंतु अधिकाºयांच्या संगनमताने या दारुभट्टीला पुन्हा परवानगी देण्यात आल्यामुळे हे दुकान पुर्ववत सुरु झाले. आता या दुकानातून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात दारुची तस्करी सुरु आहे. या तस्करीवर आळा घालण्यात भंडारा जिल्हा पोलिसांना अपयश आले असून कारवाई तीव्र करण्याची गरज आहे.