बसवाहकाची दबंगगिरी; विद्यार्थ्याला बेदम मारहाण
By admin | Published: January 31, 2015 12:32 AM2015-01-31T00:32:48+5:302015-01-31T00:32:48+5:30
मानव विकास बसच्या बसवाहकासह बसस्थानकावरील तीन ते चार वाहक व चालकांनी पासधारक विद्यार्थ्याला बसस्थानकातच बेदम मारहाण करुन सुमारे दीड तास कार्यालयात डांबून ठेवले होते.
तुमसर : मानव विकास बसच्या बसवाहकासह बसस्थानकावरील तीन ते चार वाहक व चालकांनी पासधारक विद्यार्थ्याला बसस्थानकातच बेदम मारहाण करुन सुमारे दीड तास कार्यालयात डांबून ठेवले होते. या घटनेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यात कमालीची भीती निर्माण झाली आहे. हा संतापजनक प्रकार गुरुवारी सांयकाळी ४ वाजता घडला. या प्रकरणाची तुमसर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. सासंद आदर्शगाव बघेडा येथे तणाव आहे.
तुमसर -रोंघा मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बस क्रमांक एम.एच. ०७-९५२३ तुमसर बसस्थानकावर उभी होती. चंद्रशेखर धनराज पारधी (१९) रा. बघेडा गावाला जाण्याकरिता बसमध्ये शिरला. बसवाहक एम. व्ही. लांबट याने पारधी या विद्यार्थ्याला खाली उतरण्यास सांगून त्याच्या श्रीमुखात हाणले. त्यानंतर लांबट यांनी पारधीला बसखाली खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान बसस्थानक परिसरात उभे असलेले इतर तीन ते चार वाहक-चालकांनी पारधी यास बेदम मारहाण करुन रक्तबंबाळ केले.
बसस्थानकावरील दोन ते तीन टवाळखोरांनीही पारधी यास मारहाण केली. रात्री ९ वाजता तक्रार केली. सायंकाळी ४ ते ५.३० पर्यंत बसस्थानकावरील कक्षात त्याला या कर्मचाऱ्यांनी डांबून ठेवले होते. या घटनेमुळे विद्यार्थी भयभीत झाले आहे. हा सर्व प्रकार शेकडो प्रवाशांनी तुमसर बसस्थानकावर बघितला. पंरतु विद्यार्थ्याच्या बचावाकरिता बसस्थानकावरील कर्मचारी व प्रवाशी सुध्दा धावले नाही. येथे मानवी संवेदना शून्य झाल्याचे दिसते. या घटनेमुळे बघेडा येथे तणाव निर्माण झाला आहे. वैद्यकिय अहवालात जखमा असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता वाहक एम.व्ही. लांबट याला तात्काळ निलंबित करा व इतर वाहक व चालकांना कारणे दाखवा नोटीस जारी करा याकरिता नगराध्यख अभिषेक कारेमोरे, जि.प. उपाध्यक्ष रमेशपारधी, जि.प. सदस्य सुरेश रहांगडाले, अशोक उईके, राकांचे तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, विनोद बुराडे, सिध्दार्थ घोडीचोर, सुरेश मलेवार, विद्यार्थी प्रतिनिधी हेमंत पटलेसह शेकडो विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक जे. आर. डाऊ यांना घेराव घातला. दुपारी ३ पर्यंत निलंबित न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
बघेडा सांसद आदर्श ग्राम अंतर्गत या गावाची निवड झाली आहे. विद्यार्थी प्रतिनिधीनी खासदार नाना पटोले व आमदार चरण वाघमारे यांचेकडेही तक्रार करणार असल्याचे सांगितले. यापूर्वी १७ जानेवारीला याच लांबट या वाहकाने बघेडा येथे विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. त्याची तक्रार आगार व्यवस्थापकाकडे केली होती. परंतु त्यावर कारवाई झाली नाही. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तिवारी करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)