जिल्हा ‘स्वच्छ-सुंदर’ करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 11:48 PM2017-10-03T23:48:27+5:302017-10-03T23:48:39+5:30
मी माझ्या अंत:करणातून हा दृढ संकल्प करतो की, आपले घर, शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, तलाव आणि सार्वजनिक ठिकाणी मी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देईन.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मी माझ्या अंत:करणातून हा दृढ संकल्प करतो की, आपले घर, शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, तलाव आणि सार्वजनिक ठिकाणी मी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देईन. या शब्दातील वर्णन असलेली स्वच्छता ही सेवेची शपथ, ग्रामपंचायत, प्राथमिक व माध्यमिक शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालयात घेण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून शपथ, स्वच्छता व श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ उभी करून लोकसहभागातून जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर करण्यासाठी हजारो हातांनी स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे.
१५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे या अभियानात सहभागी होऊन वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेसाठी आपले योगदान देत आहे. जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषद पदाधिकारी, विभागप्रमुख खंड विकास अधिकाºयांच्या उपस्थितीत करण्यात आला. तालुका व ग्रामस्तरावर खंडविकास अधिकारी यांचे नेतृत्वात जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीत अभियानाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त करण्यात आला.
भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी येथे पंचायत समिती, ग्रामपंचायत व शालेय स्तरावर, महाविद्यालय, शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छता ही सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक पदाधिकारी, नागरिकांनी या अभियानाला पसंती दर्शवित स्वच्छतेची शपथ घेतली.
विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्याचे फलक घेऊन स्वच्छता रॅलीतून नागरिकांपर्यंत स्वच्छतेचे महत्व सांगितले. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी हात पुढे करून घर, गाव, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करण्याची शपथ घेतली. घर, गाव, शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र,, रेल्वे स्थानक, बसस्थानक तलाव आणि सार्वजनिक ठिकाण स्वच्छ करण्यासाठी हजारो हातांनी स्वच्छता ही सेवेची शपथ संकल्प केला. या माध्यमातून स्वच्छतेची लोकचळवळ रूजविल्या जात आहे.
ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, विद्यालय, महाविद्यालय व शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरात अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी सहभाग घेऊन श्रमदान करून स्वच्छता केली. पंचायत समिती परिसर स्वच्छ करण्यासाठी खंडविकास अधिकारी यांचे नेतृत्वात अधिकारी, कर्मचारी एकजुटीने पुढे आलेत. परिसराची साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला. स्वच्छता रॅली, पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करण्यात आली. ग्रामस्तरावर या अभियानाचे माध्यमातून महिलांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय व निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, रस्ते, चौक, स्मारकांची जागा, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली. शालेय विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी स्वच्छता ही सेवा अभियानात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, योगदान देऊन स्वच्छतेची लोकचळवळ रूजविल्या जात आहे. अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विडा उचलला आहे.