भंडारा जिल्ह्यातल्या विरली गावाने केला प्लास्टिक बंदीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:51 AM2018-01-23T11:51:36+5:302018-01-23T11:53:29+5:30
उघड्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करून लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत याआधी नावारूपास आली आहेच. या गावाने आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून प्लास्टिक बंदीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उघड्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करून लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत याआधी नावारूपास आली आहेच. या गावाने आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून प्लास्टिक बंदीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले आहे.
ग्रामसभेमध्ये प्लास्टिक बंदीचा ठराव घेवून यावर शिक्कामोर्तब करण्यात येवून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर २६ जानेवारी पासूनच गावात होऊ घातलेल्या भागवत सप्ताहात महा प्रसादासाठी उपयोगात येणा-या प्लास्टीक पत्रावळीचा वापरही टाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
गावात भविष्यात होणाऱ्या लग्न समारंभात प्लास्टिक पत्रावळीचा वापर होऊ नये याकरिता विवाह निश्चित करणाऱ्या कुटूंबांसोबत संवाद साधून वापर टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय सरपंच लोकेश भेंडारकर व त्यांच्या ग्रामपंचायत चमूने घेतलेला असून २६ जानेवारीला तसा ठराव घेण्यात येत आहे.