देव्हाडीतील आरोग्य केंद्र वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:34 PM2018-04-06T23:34:40+5:302018-04-06T23:34:40+5:30
२३ गावांची आरोग्याची काळजी घेणारे देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अव्यवस्था तथा अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. आरोग्य केंद्रातील साहित्य अत्यव्यस्थ पडून होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : २३ गावांची आरोग्याची काळजी घेणारे देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अव्यवस्था तथा अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. आरोग्य केंद्रातील साहित्य अत्यव्यस्थ पडून होते. भौतिक सुविधेत अनेक त्रुट्या आ. चरण वाघमारे यांनी दिलेल्या आकस्मिक भेटीत दिसून आल्या. रुग्णांना तपासणीकरिता येथे डॉक्टर उपस्थित नव्हते, अशी माहिती थेट रजिस्टरवर आ. वाघमारे यांनी नमूद केले. यावेळी सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपचांयत सदस्य उपस्थित होते.
देव्हाडी येथे जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रणातील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सुमारे २३ गावांची आरोग्याची काळजी हे प्राथमिक आरोग्य केंद्र घेते. २५ ते २६ हजार लोकसंख्येकरिता देव्हाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड कोटी रुपये खर्च करुन इमारत येथे तयार करण्यात आली. पंरतु प्राथमिक आरोग्य केंद्र वाºयावर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. बुधवारी आ. चरण वाघमारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. भेटीदरम्यान त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात अव्यवस्था आढळून आली.
आरोग्य सेविका यु.डी. जाधव या एकमेव कर्मचारी उपस्थित होत्या. इतर कर्मचारी अनुपस्थित होते. काही वेळाने महिला डॉक्टर आरोग्य केंद्रात पोहोचल्या. तत्पूर्वी आ.वाघमारे आल्याची माहिती मिळाल्यावर इतर दोन ते तीन कर्मचारी नंतर आले.
आ. वाघमारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली तेव्हा त्यांना आरोग्य केंद्रातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले. रुग्ण तपासणीकरिता आले होते. त्यांना तपासायला कुणीच डॉक्टर हजर नव्हते. भौतिक सुविधा सोडून इतर रेकॉर्ड पाहता आले नाही. जे अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे भेट रजिस्टरवर आ. वाघमारे यांनी नमूद केले. महिला डॉक्टर गोस्वामी आरोग्य केंद्रात घरुन आल्यावर आ. वाघमारे यांनी त्यांना विचारल्यावर मी लहान बाळाला भोजन देण्याकरिता गेल्याचे सांगितले. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून जातांनी हलचल रजिस्टरवर नोंद केली काय? असा प्रतिप्रश्न आ. वाघमारे यांनी केला. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष कारणीभूत आहे.
आ. चरण वाघमारे यांनी दिलेल्या आकस्मीक भेटीप्रसंगी सरपंच रिना मसरके, पं.स. सदस्य अशोक बन्सोड, उपसरपंच लव बसीने, सुशिल बन्सोड, ग्रा. पं. सदस्य बालू सेलोकर, देवेंद्र शहारे, ज्ञानेश्वर बिरणवारे, उषा चावके, कुंदा बोरकर, ललीता नागपूरे, रत्ना मेश्राम, विमल बोंदरे, राजकुमारी लिल्हारे, माजी उपसरपंच जयंत पडोळे, पिंटू सिंग, बाळा मेश्राम सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.