विकास करु या गावाचा, दिवा लावू या ज्ञानाचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:59 PM2017-10-27T23:59:51+5:302017-10-28T00:00:03+5:30
ग्रामीण भागातील कलावंत दंडार, तमाशा, नवटंकी नाटीका या लोककलेचा आजही सन्मान करतात. या कलावंत मंडळींनी लोककला जीवंत ठेवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : कसं सडलं दारुने मन, हरपले भान,
पर्वा नाही केली रे जीवाची
लाज खोवली प्रतिष्ठेची.
या पंक्तीतून दारुचे दुष्परिणाम कसे होतात याचे सादरीकरण दंडार या लोककलेच्या माध्यमातून कान्हळगाव/सिर. येथील सुभान मंडळाने कान्हळगाव येथे झालेल्या मंडई कार्यक्रमातून केला.
ग्रामीण भागातील कलावंत दंडार, तमाशा, नवटंकी नाटीका या लोककलेचा आजही सन्मान करतात. या कलावंत मंडळींनी लोककला जीवंत ठेवली आहे. तथापि, ही ग्रामीण भागातील कलावंत उपेक्षित जीवन जगत आहे. या कलाकरांना शासनाच्या वतीने मानधन दिले जात नाही. तरीही कान्हळगावसारखे इतरही कलावंत कलेची साधना करीत आहेत. कान्हळगाव येथे गुरुवारी पार पडलेल्या दंडारीतून सुभान मंडळाचे प्रमुख रामदयाल लिल्हारे, गुरु बागडे यांनी अंधश्रध्दा, दारुबंदी, स्वच्छता तसेच शिक्षण या विषयावर मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य केले. जर, जर या, भर भर या, विकास करु या गावाचा दिवा लावू या ज्ञानाचा. यातून गावाचा विकास करण्यासाठी शिक्षणही कसा आवश्यक असतो. याविषयी महत्व पटवून दिले. एक दशकापूर्वी रामदास बोरकर या कलावंताने दंडारीच्या मंडळाला जन्म दिला होता.
त्यांच्या मृत्यूनंतर शाहीर रामदयाल लिल्हारे, गुरु बागडे या प्रमुखानी बाबूराव कस्तुरे, नरबद कस्तुरे, बिहारी कस्तुरे, सरबत कस्तुरे, बंडू मारवाडे, नत्थू बागडे, दत्तू लुटे, सुर्यभान डोंगरे, मुरलीधर गलबले, भास्कर गलबले, विजय कस्तुरे, मनोज नागपूरे यांच्यासह या दंडारीच्या संचाला पुढे नेले आहे. दंडार, भजन आदी कार्यक्रमात आर्वाजून सक्रीय सहभाग होणारे वृध्द कलावंत बाबूराव कस्तुरे यांचा नाटय लेखक तेजराम मोहारे यांच्या हस्ते दंडारीच्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच देवराम चवळे, राजू बांते, प्रा.डॉ. सुनिल चवळे, गणेश ठवकर, नाटय कलावंत रामप्रसाद वहिले आदींची उपस्थिती होती.