पाच दशकांपासून बौद्ध स्तुपांचा विकास रखडलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:01 AM2017-12-13T00:01:35+5:302017-12-13T00:02:22+5:30

भारतीय पुरातत्व विभागाने संयुक्तपणे केलेल्या उत्खननात ऐतिहासिक व प्राचीन पवनी नगराजवळ अडीच हजार वर्षापूर्वीच्या मिळालेल्या तीन बौद्ध स्तुपांपैकी चंडकापूर स्तुपाला फार महत्व आहे.

The development of Buddhist stupas for five decades has been stalled | पाच दशकांपासून बौद्ध स्तुपांचा विकास रखडलेला

पाच दशकांपासून बौद्ध स्तुपांचा विकास रखडलेला

googlenewsNext
ठळक मुद्दे-तर होऊ शकतो पवनीत पर्यटनाचा विकास : उत्खननात आढळले होते अवशेष

आॅनलाईन लोकमत
पवनी(भंडारा) : भारतीय पुरातत्व विभागाने संयुक्तपणे केलेल्या उत्खननात ऐतिहासिक व प्राचीन पवनी नगराजवळ अडीच हजार वर्षापूर्वीच्या मिळालेल्या तीन बौद्ध स्तुपांपैकी चंडकापूर स्तुपाला फार महत्व आहे. भारतात साचीच्या स्तुपानंतर प्रथमच या चंडकापूर स्तुपात अस्थी व दंत धातूने भरलेला कलश आढळला आहे. जवळपास पाच दशकांचा कालावधी लोटूनही केंद्र, राज्य सरकारने व पुरातत्व विभागाने या स्तुपाच्या विकासाकडे दुर्लक्ष आहे.
कलशाच्या रुपात प्रथमच रंगीत भांडे, अस्थी व दंतधातू नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या पुरातत्व विभागात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या स्तुपाची वास्तू चांगली व सुस्थितीत असून स्तुपाचा उंचवटा आकर्षक, सुंदर दिसतो. या स्तुपाविषयी कोणताही वाद नसल्यामुळे या स्तुपाचा पुरातत्वदृष्ट्या व पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे या स्थळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व येवू शकेल.
चंडकापूर स्तुपाची गणना भारतातील महास्तुपांमध्ये करता येते. इतका मोठा त्याचा आकार आहे. या स्तुपाचे आणखी एक वैशिष्ट्ये असे की स्तुपाच्या मधोमध सुमारे ८ मिटर खोलीवर विटांनी बांधलेल्या एका कुंडाकृती मध्ये एक मातीचे भांडे मिळाले. या मृदभांड्याचा आकार घटाकृती असून त्याचा बाह्यपृष्ठभाग तांबड्या रंगाचा आहे. त्यावर काळ्या रंगात जाड पट्टे रंगविण्यात आलेले आहेत. आतापर्यंतच्या संशोधनात भारतात कोठेही असे भांडे सापडलेले नाही. मिळालेल्या अवशेषांवरून असे वाटते की, हा स्तुप मुळात एखाद्या सुप्रसिद्ध बौद्ध भिक्षुचे अवशेष जतन करण्यासाठी बांधण्यात आला असावा, असा कयास आहे.
उत्खननात सापडले नाणे
चंडकापूर स्तुपाच्या उत्खननात एक नाणे सापडले. ते चौरस आकाराचे असून लांबी १.७२ से.मी. रुंदी १.७१ से.मी. व वजन २.५ ग्रॅम आहे. एका बाजूला आठ आºयांचे चक्र रेखांकीत असून दुसरी बाजू कोरी आहे. या नाण्याचा काळ हा सातकर्णी वंशाच्या राजाशी असण्याचा अंदाज लावण्यात आला आहे. हा काळ इ.सन पूर्व पहिले शतक असा निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच हा स्तुप जगन्नाथ टेकडीतील स्तुपानंतर बांधण्यात आला होता.
बौद्ध स्तुप म्हणून नोंद
पवनी शहरापासून तीन कि.मी. अंतरावर व जगन्नाथ टेकडी स्तुपाजवळ पवनी, सिरसाळा मार्गावर उजव्या बाजूला चंडकापूर तलाठी साजा क्र. ३० मधील भूमापन गट क्र. १२५ मध्ये चंडकापूर टेकडीवरचा हा बौद्ध स्तुप दीड ते दोन एकरात आहे. तलाठी अभिलेखानुसार सातबारामध्ये या संपूर्ण जागेची बौद्ध स्तुप म्हणून नोंद आहे. स्तुप बांधण्याची पद्धत ही जगन्नाथ टेकडी स्तुपापेक्षा वेगळी आहे. चंडकापूर टेकडीवर जगन्नाथ टेकडी प्रमाणे कोणत्याही प्रकारची वास्तू बांधलेली नाही. त्यामुळे या टेकडीतील अवशेष अखंड स्वरुपात अखंड मिळणे शक्य झाले आहे. उत्खननाकरिता संबंध टेकडीवर जाळी पद्धतीने खड्डे आखून १९७० च्या दशकात प्रथमतक्ष उत्खनन करण्यात आले. यात जगन्नाथ टेकडी प्रमाणेच आणखी एका अतिभव्य स्तुपाचे अवशेष उजेडात आलेत. ७.५ मिटर उंच व ४१.६ मिटर व्यासाचा हा स्तुप आपल्या उन्नतावस्थेत किती भव्य दिसत असावा, याची कल्पना येते.

Web Title: The development of Buddhist stupas for five decades has been stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.