राष्ट्रसंतांच्या शिकवणीतूनच देशाचा विकास शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 09:22 PM2018-12-16T21:22:11+5:302018-12-16T21:22:29+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतावादी साहित्याची रचना केली. श्रध्दा व सुविचाराने माणुस घडतो, संघटन होते. त्यामुळेच गावाला, राज्याला, देशाला समृध्दीकडे घेवून जाता येते. राष्ट्रसंताच्या शिकवणीवर श्रध्दा असेल तरच देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतावादी साहित्याची रचना केली. श्रध्दा व सुविचाराने माणुस घडतो, संघटन होते. त्यामुळेच गावाला, राज्याला, देशाला समृध्दीकडे घेवून जाता येते. राष्ट्रसंताच्या शिकवणीवर श्रध्दा असेल तरच देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.
पवनी येथील संभाजी चुटे रंग मंदिरात आयोजित चवथ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी साहित्य संमेलनासाठी आमदार निधीतून दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी संमेलनाध्यक्ष दा. श्रा. पाटील, आमदार चरण वाघमारे, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष पुनम काटेखाये, मार्गदर्शक डॉ. अरविंद देशमुख, ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, विलास काटेखाये, विकास राऊत, मोहन पंचभाई, विजय ठाकुर, सुबोधदादा, विरमाता, सुधाताई मोहरकर, अंबादास मोहरकर, डॉ. प्रकाश देशकर, केशवराव निर्वाण, अनुराधा बुराडे, सुशिलादीदी, डॉ. मुळे उपस्थित होते.
यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी ग्रामगीतेमुळे आपण व्यसनांपासुन दूर राहिलो. अशी प्रांजळ कबुली दिली. सर्व धर्म समभाव ही शिकवण राष्ट्रसंतानी दिल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष दा. श्री. पाटील यांनी राष्ट्रसंताचे साहित्य व विचार यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वा. चं. रायपूरकर यांनी केले. स्वागत भाषण विलास काटेखाये तर संचालन रतन लांडगे, आभार शशिकांत भोयर यांनी मांडले.
ग्रामगीतेचे मोफत वितरण
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी मोफत वितरणासाठी ग्रामगीता उपलब्ध करुन दिली. लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने तयार केलेल्या राष्ट्रसंताच्या जीवन कार्यावरील दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.