गुरुमुळे होतो सृजनशील विचारांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2017 12:14 AM2017-07-10T00:14:57+5:302017-07-10T00:14:57+5:30
मानवी जीवनात एखाद्या व्यक्तीत ९९ टक्के अवगुण तर एक टक्का चांगला गुण असेल तर त्या एक टक्का गुणाला विकसित करण्याचे खरे कार्य गुरु करित असतो.
विनिता साहू : महर्षी शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मानवी जीवनात एखाद्या व्यक्तीत ९९ टक्के अवगुण तर एक टक्का चांगला गुण असेल तर त्या एक टक्का गुणाला विकसित करण्याचे खरे कार्य गुरु करित असतो. गुरुंच्या मार्गदर्शनामुळे आत्म्याचे शुध्दीकरण होऊन सृजनशील विचारांचा विकास होतो, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.
महर्षी विद्या मंदिर शाळा उमरी (भंडारा) येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर प्राचार्य श्रृती ओहळे उपस्थित होत्या. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीचे औचित्य गुरु पूजनाच्या दिवशी अत्यंत महत्वाचे आहे. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते गुरुपूजनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक सदरात अप्रतिम नृत्य सादर करुन उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांची मने जिंकून घेतली. सकाळ सत्रात सहा सत्रीय महासत्यनारायणची पुजा करण्यात आली. यात ४३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक साहू यांच्या हस्ते महर्षींच्या जीवनावर आधारित तथा शाळेसंबंधी माहितीच्या पुस्तकाचे विमोचण करण्यात आले. साहू म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रतिभा लपलेली असते. ती प्रतिभा बाहेर काढण्याचे काम शिक्षक करीत असतात. विश्वशांती अभियानांतर्गत हिंदू संस्कृतीचा अभिमान सर्वांनी बाळगायला हवे असेही त्या म्हणाल्या. दरम्यान शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून विश्व शांती अभियानाचा शुभारंभ आ. अॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्याचा समारोप आज रविवारी गुरुपौर्णिमेला झाला. उत्सवासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.