इन्स्पायरमधून घडतोय सृजनशक्तीचा विकास
By admin | Published: September 16, 2015 01:26 AM2015-09-16T01:26:15+5:302015-09-16T01:26:15+5:30
जीवनात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे समाधान करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करुन विद्यार्थी ....
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी : ऊर्जा निर्मितीवर आधारित मॉडेल जास्त
इंद्रपाल कटकवार भंडारा
जीवनात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे समाधान करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करुन विद्यार्थी सक्षम व समृध्द झाला पाहिजे, हा मुळ उद्देश समोर ठेवून केंद्र तथा राज्य शासनाच्या माध्यमातून पुरस्कृत इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनीतून शेकडो विद्यार्थी आपल्यामधील सृजन शक्तीचा विकास घडवित आहेत. महर्षी विद्या मंदिर बेला येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सादर करण्यात आलेल्या प्रतिकृतींमधून विद्यार्थ्यांचे बुध्दी कौशल्य दिसून येत आहे.
भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून व ११ व्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून सदर इन्स्पायर अवॉर्ड उपक्रम अविरतपणे चालविला जात आहे.
सन २०१४-१५ अंतर्गत केंद्र शासन, माहिती व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन परिषद पुणे आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन १४ ते १६ सप्टेंबरपर्यंत महर्षी शाळेत करण्यात आले आहे.
या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त प्रतिकृती उर्जेवर आधारित साकारलेली आहेत. ऊर्जा कशी तयार करता येईल, उर्जेची बचत व शुध्द पाणी मिळण्यावर, या बाबींवर विद्यार्थ्यांनी भर दिला आहे. प्रदर्शनीत माती व पाणी व्यवस्थापन, धुरापासून वीज निर्मिती, गंगा स्वच्छता अभियान, सोलर वाटर हिटर, सोलर वाटर पंप सिस्टम, कागदी कचऱ्यापासून इंधन व विद्युत निर्मिती, स्वयंचलित मोबाईल मनोरा, पावसाच्या पाण्याचे सनियोजन, भुकंप अलार्म सिस्टम, ग्रामीण भागात पाण्यापासून वीज निर्मिती, पाणी शुध्दीकरण संयत्र, रस्ते व लोहमार्गावरील भुस्खलन एक समस्या आदी विषयांवर आधारित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर करण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनीचे आज मंगळवारी दुपारच्या सुमारास उद्घाटन करण्यात आले.