जिल्ह्यात निधीअभावी पर्यटन विकासाची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 09:56 PM2018-05-29T21:56:06+5:302018-05-29T21:56:21+5:30
जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली स्थळे जिल्ह्यात आहेत. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाचे गाजर दाखवून पर्यटनविकासाच्या नावाखाली विकासाची वानवा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन भरभराटीला येण्यासाठी खुंटत चाललेली आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर हा उत्तम नमूना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली स्थळे जिल्ह्यात आहेत. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाचे गाजर दाखवून पर्यटनविकासाच्या नावाखाली विकासाची वानवा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन भरभराटीला येण्यासाठी खुंटत चाललेली आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर हा उत्तम नमूना आहे.
नदी तलाव वनसंपदा, डोंगररांगा, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा जिल्ह्याला लाभला आहे. कोका, उमरेड, पवनी, कºहांडला अभयारण्य, पांडे महाल, चांदपूर, रावणवाडी जलाशय, गोसीखुर्द अशा पर्यटनाला मोठा वाव आहे. परंतु अद्यापही मात्र पाहिजे त्या प्रमाणात सौंदर्यीकरण व दृष्टीकोनातून विकासाचा स्पर्श येथे झालेला नाही. लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळ विकासापासून कोसो दूर आहेत.जर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना चांगल्या प्रकारे विकसीत केले तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मात्र पर्यायाने रोजगार निर्मितीची संधी सुद्धा स्थानिकांसाठी दुरावली आहे.
रोजच्या रोज बेरोजगारी वाढत आहे. जिल्ह्यात मोठ्या कंपन्यासुद्धा नाहीत. यामुळे येत्या दिवसात बेरोजगारी तीव्र रुप धारण करणार आहे. यासाठी पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे आहे. तीन हजार ७१६ वर्ग कि.मी. क्षेत्रात असलेल्या भंडारा जिल्ह्यात विपूल वनसंपदा आहे. कोका, उमरेड, पवनी करांडला अभयारण्य प्रकल्प आहेत. वॉर्डांच्या अधिवासासाठी भंडारा जिल्ह्यातील जंगल उत्तम मानले जाते. कोका उमरेड, पवनी करांडला अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध असल्याने पर्यटकांची नेहमी वर्दळ राहते.
भंडारा शहरातील पांडे महाल हा ऐतिहासीक वारसा म्हणून उभा आहे. त्याची विक्री झाल्याने भविष्यात हा महाल दिसणार की नाही? यात शंकाच आहे.
तुमसर तालुक्यातील आंबागड, गायमुख, चांदपूर हे ठिकाण पर्यटकांना भुरळ घालतात. मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिरापासून सुरु झालेले पर्यटन नरसिंग मंदिर देव्हाडापर्यंत आहे. भंडारा जिल्ह्याला वैनगंगा नदीचे विशाल पात्र आहे. टेकडीवरील मंदिर रमणीय परिसर आहे. भंडारा पासून निघालेले पर्यटक एकाच मार्गावर एक ते दोन दिवसात पाच ते सात ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा आस्वाद घेऊ शकतात.
मात्र त्या दिशेने प्रयत्न होताना दिसत नाही. दुसरीकडे पवनी तालुका या बाबतीत आघाडीवर आहे. भंडारा तालुक्यात रावणवाडी तलावापासून गोसीखुर्द, अड्याळ येथील हनुमान मंदिर, गोसेखुर्द धरण, रुयाड येथील बौद्ध स्तुप, पवनी शहरातील प्राचीन मंदिर अशी एक विस्तीर्ण श्रृंखला पर्यटकांसाठी उपलब्ध आहे.
मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. जर लक्ष दिले असते तर आज जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असती. स्थानिकांना पर्यटनस्थळामुळे रोजगार मिळाला असता. लोकप्रतिनिधींचे लक्ष केव्हा लागते तर बघू. जिल्ह्यातपर्यटन स्थळाच्या विकासाची वानवा दिसून येते. लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे रोजगार निर्मितीला अडसर ठरत आहे.