स्त्रीचा विकास म्हणजे समाजाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:07 AM2019-02-24T01:07:17+5:302019-02-24T01:08:04+5:30
स्त्रियांना मूलभुत अधिकार बहाल करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी दाखवलेली दिशा घेवून समाजाचा विकास करावा. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समाजात त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करावा. त्यामुळे स्त्रीचा विकास म्हणजे समाजाचा; किंबहुना देशाचा विकास संभव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : स्त्रियांना मूलभुत अधिकार बहाल करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी दाखवलेली दिशा घेवून समाजाचा विकास करावा. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समाजात त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करावा. त्यामुळे स्त्रीचा विकास म्हणजे समाजाचा; किंबहुना देशाचा विकास संभव आहे. याकरिता प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन मातास्वरूप असावा, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे माजी सदस्य तथा संस्था सचिव डॉ. जी.डी. टेंभरे यांनी येथे केले.
पेट्रोलपंप जवाहरनगर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने ‘डॉ. आंबेडकर स्त्रीविषयक कार्य’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सरीता घोल्लर, प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. नलिनी बोरकर उपस्थित होते.
सरीता घोल्लर म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या उत्थानात अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी हिंदू कोड बिल भारतीय संविधानात समानतेचा अधिकार मिळवून दिला. भारतीय महिलांना प्रसूती रजा आणि कामाच्या तासाचे नियोजित करून दिले, अशा अनेक तरतुदी केल्या आहे. आजची स्त्री आपल्या अधिकाराप्रती जागरूक असली पाहिजे. त्यातून अन्यायाला दूर केले पाहिजे, स्वत:ची प्रगती साधने हे स्त्रियांच्या हातात असल्याचे त्यांनी सांगतले.
प्राचार्य डॉ.अजयकुमार मोहबंशी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांचा हक्क आणि अधिकाराबद्दल जागृत केले. आता स्त्रियांनी स्वत:चा विकास करून घ्यावा व आपल्या कुटुंबानाही योग्य मार्गदर्शनाद्वारे विकासाच्या प्रकाश झोतात आणावे, असे सागिंतले. प्रास्ताविक समन्वयक डॉ. नलिनी बोरकर यांनी केले. संचालन प्रा. एस.आर. गोंडाने यांनी तर आभार डॉ. सी.पी. साखरवाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.