विकास कामांचे फलक बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2017 12:47 AM2017-07-03T00:47:39+5:302017-07-03T00:47:39+5:30
ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना व्हावी,
शासन आदेश : जनतेला मिळणार गावातील कामांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी कामांच्या ठिकाणी दर्शकफलक लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे शासन आदेश निर्गमित झाले असून, ग्रामपंचायतींना तसे पत्र ग्रामविकास विभागाने पाठविले आहे.
१४ व्या वित्त आयोगांतर्गत केंद्राच्या मार्गदर्शक सूचनानुसार ‘आमच गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत विकास आराखडा तयार करून त्यानुसार ग्रामपंचायतींना अंमलबजावणी करावयाची आहे. याबाबतच्या सूचना ग्रामविकास विभागामार्फत ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले आहे. त्यानुसार १४ व्या वित्त आयोगाच्या तसेच इतर स्रोतांमधून प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या निधीची सांगड घालून ग्रामस्तरावर गरजा व निकड लक्षात घेता प्राधान्यक्रमानुसार लोकसहभागातून ग्रापंचायत विकास आराखडा तयार करणे व त्यानुसार उपक्रमांचे नियोजन करावयाचे आहे. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीच्या बळकटी करण्यासाठी जनरल बेसिक ग्रँट व परफार्मन्स गँटच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वितरित निधीनुसार ग्रामपंचायतने केलेली कामे व त्यावरील खर्चाबाबत पारदर्शकता ठेवण्याचा दृष्टीकोणातून व केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, यासाठी कामांचे फलक संबंधित ठिकाणी तसेच ग्रामपंचायत कार्यालयात ठळकपणे दिसतील अशा प्रकारे लावण्याचे आदेश दिले आहेत.
ही माहिती राहणार अंकित
या फलकांवर चौदाव्या वित्त आयोग तसेच इतर स्रोतामधून ग्रामपंचायतींना आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीमधून ग्रापंचायतीव्दारे करण्यात आलेली कामे, कार्यक्रम, काम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, कामावर करण्यात आलेला खर्च या संबंधीची माहिती राहणार आहे. हे फलक ग्रामपंचायतमध्ये मध्यवर्ती ठिकाणी व सहज दिसतील अशा प्रकारे लावण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे.