बाप्पाच्या निरोपासाठी भाविक सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:29 PM2018-09-22T22:29:49+5:302018-09-22T22:30:26+5:30
दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. रविवारी जिल्हाभरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी भाविकांसोबत प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. भंडारा शहरातील वैनगंगा नदीसह ठिकठिकाणच्या तलावात आणि पर्यावरण रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाक्यांमध्येही गणेशाचे विसर्जन होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. रविवारी जिल्हाभरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी भाविकांसोबत प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. भंडारा शहरातील वैनगंगा नदीसह ठिकठिकाणच्या तलावात आणि पर्यावरण रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाक्यांमध्येही गणेशाचे विसर्जन होणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील घराघरात आणि गावागावात गणेशाची स्थापना गणेश चतुर्थीला म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी उत्साहात करण्यात आली होती. जिल्ह्यात ७५५ खाजगी, १९२ सार्वजनिक तर १९८ गावात एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला होता. यासोबतच अनेकांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले होते. दहा दिवस शहरासह जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण होते. भंडारा शहरातील भंडाराचा राजा, गणेशपुरचा राजा, बजरंग चौकातील त्रिमुखी दत्त रूपातील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी दररोज रात्री भाविकांची प्रचंड गर्दी उसळत होती. विविध धार्मिक कार्यक्रमासोबत मंडळांनी सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. आता रविवारी बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. मुर्तीचे विसर्जन शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विजर्सन स्थळावर तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातही पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आहे.
भंडारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि ठाण्याच्याच ग्रामीण भागात नऊ असे ४६ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. १९ पासून गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला. मात्र रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील १४ आणि लगतच्या ग्रामीण भागातील तीन गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विसर्जन होणार आहे. सागर तलाव, पिंगलाई बोडी, मिस्किन टँक, वैनगंगा नदी, सुरनदी, गावतलाव आणि पर्यावरणपुरक विजर्सन टँकमध्ये गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे.
भंडारा शहरातील वैनगंगा नदी, मिस्किन टँक याठिकाणी गणपतीचे विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक काढून बाप्पाना वाजत गाजत निरोप देणार आहेत. तसेच घरगुती गणपतीचेही विसर्जन रविवारी केले जाणार आहे. यासाठी वैनगंगा नदीच्या तिरावर पोलिसांनी सुरक्षेची उपाय केले आहे. त्याची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी केली.
ईलेक्ट्रॉनिक बोट आणि प्रकाश व्यवस्था
गणेश विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासोबतच ईलेक्ट्रॉनिक बोट, प्रकाश व्यवस्था, पट्टीचे पोहणारे कर्मचारी, दोरखंड, हवा भरलेले रबरी ट्युब अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस विभाग दक्ष राहणार आहे. जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर यांच्या नेतृत्वात तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, दहा पोलीस निरीक्षक, २१ सहायक फौजदार, ४० पोलीस उपनिरीक्षक आणि एक हजार ७२ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश मिरवणुकीत पोलीस तैणात राहणार असून विसर्जनस्थळीही खडा पहारा राहणार आहे. सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि गणेश मंडळांचे स्वयंसेवकही या कामात मदत करणार आहे.
पर्यावरणाचे रक्षण करा
गणेश विसर्जनस्थळी प्रत्येक मंडळाने पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आणि विसर्जन स्थळी निर्माल्यासह विविध वस्तु टाकल्या जातात. त्यामुळे विसर्जन स्थळाला विद्रुप काही दिवसानंतर येते. यासाठी घरगुती गणेशाचे शक्यतोवर पर्यावरणपुरक कृत्रिम टँकमध्येच नागरिकांनी विसर्जन करण्याची गरज आहे.