जागतिक बँक अभियंत्यांकडून देव्हाडी उड्डाणपुलाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:50 PM2019-08-05T22:50:29+5:302019-08-05T22:50:46+5:30
देव्हाडी उड्डाणपुलाच्या पोचमार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या सिमेंट कांक्रीट पॅनेल्सच्या जोडमधून राख सातत्याने निघत आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी ‘पावसानंतर उड्डाणपुलातून वाहू लागली राख’ असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता व पथकाने पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी उड्डाणपुलाच्या पोचमार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या सिमेंट कांक्रीट पॅनेल्सच्या जोडमधून राख सातत्याने निघत आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी ‘पावसानंतर उड्डाणपुलातून वाहू लागली राख’ असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता व पथकाने पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.
रामटेक - तुमसर - तिरोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४९ वर रेल्वे क्रॉसींग १३५ वर देव्हाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मागील पाच वर्षापासून भरावात राख घालण्यात आली. पावसात भरावातील राख सिमेंटच्या दगडातून पोचमार्गावर वाहत आहे. राख वाहून जात असल्याने पोचमार्गावर भगदाड व खड्डे पडणे सुरु झाले आहे. उद्घाटनापुर्वीच उड्डाणपुलावरील भगदाड व खड्यांमुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघाताला आमंत्रण देणारा हा मार्ग अशी त्याची ओळख निर्माण होत आहे.
शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्या अनुषंगाने नागपूरचे कार्यकारी अभियंता बांधवकर, सहाय्यक अभियंता नागवडे, शाखा अभियंता पिपरेवार यांनी पुलाची केली. यावेळी देव्हाडीच्या सरपंच रिता मसरके, खुशाल नागपूरे आदींनी राखेबाबत प्रश्न उपस्थित केले.
जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
देव्हाडी येथील उड्डाणपूलाच्या प्रकरणी कार्यकारी अभियंता बांधवकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन चर्चा केली. तथा वाहणाऱ्या राख व पुलावरील खड्याबाबत अहवाल सादर केला. त्यात पोचमार्गावरील पडणाऱ्या खड्याचे वेळोवेळी निरीक्षण करुन त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल व पोचमार्ग सुस्थितीत राहील याची दक्षता घेण्यात येईल असे आश्वस्त करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी गीते यांनी पुलावर पडलेले खड्डे दुरुस्ती करण्यासाठी तसेच खड्डे पडल्याचे व सिमेंट काँक्रीट पॅनलच्या जोडमधून राख निघत असल्याचे कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचा सुचना केल्या आहे. सदर सुचनांचे पालन करण्याची ग्वाही कार्यकारी अभियंता बांधवकर यांनी दिली.
पालकमंत्र्यांशी चर्चा
भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी चार दिवसांपूर्वी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देव्हाडी उड्डाणपूलाबाबत चर्चा केली आहे. राख वाहून जाणे व पूलावर भगदाड पडणे ही गंभीर बाब असून तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश डॉ. परिणय फुके यांनी दिले.
देव्हाडी उड्डाणपूलावर भगदाड पडणे व सतत राख वाहून गेल्याने तो पोकळ झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केवळ भगदाड भरणे व ग्राऊंडीग करुन राख वाहून जाऊ न देणे ही कायमस्वरुपी उपाययोजना नाही. संपूर्ण पूलातून आजही राख वाहत आहे. येथे तज्ञांकडून निरीक्षण करुन उड्डाणपूलाची चौकशी करण्यात यावी, पुलावरुन वाहतुक सुरु झाल्यानंतर अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील.
- डॉ. पंकज कारेमोरे
काँग्रेस नेते, तुमसर