धानाला सडका वास
By admin | Published: October 6, 2016 12:53 AM2016-10-06T00:53:12+5:302016-10-06T00:53:12+5:30
धानाचे कोठार असलेल्या आपल्या जिल्ह्याला मागील १५ दिवसांपासून अस्मानी संकटाने घेरले आहे.
धानाचे कोठार संकटात : शेतकरी घाबरला, पाऊस थांबणे गरजेचे
पालांदूर : धानाचे कोठार असलेल्या आपल्या जिल्ह्याला मागील १५ दिवसांपासून अस्मानी संकटाने घेरले आहे. हलके व माध्यम धान कापणीला आले असून काही ठिकाणी कापणी केलेले धान सडत आहे. तर काही ठिकाणी हवा व पाऊसाचा जोरदार झोताने धान भुईसपाट झाले. सततच्या पावसाने बांधातील पाणी निघत नसल्याने पडलेल्या धानाचा सडका वास येत आहे तर कित्येक शेतकरी पडलेला धान उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
मागील तीन वर्षाचा ओला, कोरडा दुष्काळ, डोक्यावर घेत हिम्मतीने नव्या हंगामाला शेतकरी नव्या उर्जेने तयार होते. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जुन महिन्यात पाऊसाची अत्यल्प हजेरीने पेरणी अर्धी व लांबली जुलै महिन्यात समाधानकारक पण कही खुशी कही गम करीत हजेरी लावली. आॅगस्टला ताण देत निंदन वाढला. धान कमी पण निंदण जास्त, अशी स्थिती झाली. सप्टेंबरला पहिला, दुसरा हपत्यात कमी जासत हजेरी लावीत महिनाअखेरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुळतुळा, अळी, करपा यांचा त्रास वाढल्याने नियंत्रणाकरीता खर्च वाढला. कृषी विभाग जेमतेम एखादेवेळेस अनुदानावर औषधी पुरवितात ही नियमित करून खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. करपा रोगात नविन प्रश्न तयार झाला असून निसवलेली लोंबी अक्षरक्ष: पांढरी होतात. दाणे भरतच नाही बऱ्याच शेतात गळ्याजवळील दाणे पोचटच असतात, असे रोग नवीन असल्याने सामान्य शेतकऱ्याला कळणारे नसल्याने नुकसान होत आहे.
लाखनी तालुक्यातील चुलबंधच्या खोऱ्यातील धानशेती पावसाने प्रभावित झाली असून लोहारा, नरव्हा, मऱ्हेगाव, वाकल, खराशी, पाथरी शिवारात धान कापले असून सततच्या पावसाने सडत आहेत. पाणी बांधातून पूर्णपणे निघत नसल्याने मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभी झालेली आहे. पंजाबराव कृषी विद्यापिठ अंतर्गत साकोली कार्यालयातून डॉ. उषा डोंगरवार व्हॉटसअॅपवरून माहिती पुरवित ५ आॅक्टोंबरपर्यंत पावसाचा अंदाज असून धान कापणी न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
शासन-प्रशासनाने पिकविमा उतरविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्यात नैसर्गीक आपत्ती आल्यास लाभ मिळणार म्हटले होते. पंधरादिवसापासून भंडारा जिल्ह्यात रोगराई व पावसाच्या कहराने धानपिक नुकसानग्रस्त झाले आहे. ते पाहण्याकरीता विमा कंपनी किंवा अधिनस्त कर्मचारी फिरकले नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सावरण्याची गरज आहे. (वार्ताहर)