शिक्षकांअभावी ढिवरवाडा शाळा बंद
By admin | Published: July 14, 2016 12:35 AM2016-07-14T00:35:19+5:302016-07-14T00:35:19+5:30
ढिवरवाडा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत वर्ग एक ते पाच असून येथे शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
ग्रामस्थांचा निर्णय : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
करडी (पालोरा) : ढिवरवाडा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत वर्ग एक ते पाच असून येथे शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.
पटसंख्येनुसार वर्ग पहिली ते पाचवीला चार शिक्षकांची गरज आहे. वर्ग सहा ते आठ ला प्रत्येकी एक या प्रमाणे तीन शिक्षकांची गरज आहे. १ जुलै रोजी या शाळेतील एक शिक्षक जांभोरा शाळेत पाठविला. त्यामुळे पदविधर शिक्षकाची जागा रिक्त झाली आहे.
शिक्षकांची संख्या कमी असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकाच्या मागणीसाठी शाळा शिक्षण समिती व ग्रामस्थांनी आजपासून शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शाळा समिती अध्यक्ष बी.एन. हिंगे, भोजराज वनवे, सरपंच एस.के. वनवे, उपसरपंच नितीन रामटेके, सहसराम वनवे, कैलाश हिंगे, भारत वनवे यांच्यासह ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर)
बपेरा येथे वर्ग चार; शिक्षक एक
उसर्रा : तुमसर तालुक्यातील बपेरा (आंबागड) येथे एका शिक्षकावर चार वर्ग सांभाळण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बपेरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ वर्ग आहेत. शाळेत एकुण विद्यार्थीसंख्या ५० इतकी आहे. शाळा सुरु झाली तेव्हापासून एकच शिक्षक पूर्ण शाळा सांभाळत असल्याने चार वर्गाना एक शिक्षक कुठपर्यंत शिकविणार असा प्रश्न पालकांनी केला आहे. या आधी मागीलवर्षी सदर शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामवासीयांनी शिक्षकांच्या मागणीसाठी थेट पंचायत समिती तुमसर येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांसमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावर एक शिक्षक देण्यात आले होते. एक शिक्षक रजेवर असताना संबंधित विभागाने दुसरा शिक्षक येरली शाळेतून दिला होता. त्याही शिक्षकाला संबंधित विभागाने घेऊन गेले. आंबागड शाळेतून शिक्षक दिले होते तेही शिक्षक परत नेले. मानधनावर एक शिक्षक नेमण्यात आला आहे. मात्र तेही बंद करण्यात आले. मानधनावर शिक्षक घेणार नाही असा पवित्रा बपेरावासीयांनी घेतला आहे.(वार्ताहर)