धुळवडीत ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ची धूम
By admin | Published: March 26, 2016 12:28 AM2016-03-26T00:28:52+5:302016-03-26T00:28:52+5:30
होळी, धुळवड आणि लागून आलेल्या सुट्यांमुळे ड्रंक अँण्ड ड्राइव्हच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
भंडारा : होळी, धुळवड आणि लागून आलेल्या सुट्यांमुळे ड्रंक अँण्ड ड्राइव्हच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. सातत्याने होत असलेल्या जनजागृतीमुळे टिळा लावून धुळवड साजरी करण्यात आली. वाहतूक पोलीसांनी होळीच्या दिवशी एकूण ६५ तर, धुलिवंदनाच्या दिवशी ११ केसेस दाखल केल्या होत्या. यामध्ये दारू पिऊन वाहन चालविण्याच्या दोन केसेस धूलिवंदनाच्या दिवशी दाखल आहेत.
धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन वाहने चालवताना वाहनचालकांकडून अन्य नियमही धाब्यावर बसविले जातात. अशा वाहनचालकांची वाहतूक पोलिसांकडून धरपकड करून दंडात्मक कारवाईही केली जाते. गुरुवारी, धूलिवंदनाच्या दिवशी एकूण ११ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
धुलीवंदनाच्या दिवशी वाहनचालकांकडून सर्रासपणे नियम धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे अशा चालकांना जाळ्यात पकडण्यासाठी यावेळी वाहतूक पोलिसांनी व्यूहरचना आखली होती. शहर आणि महामार्गावर यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येत होती.
पोलिसांचे विशेष लक्ष हे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालक आणि वाहनांवर होते. त्याचबरोबर ट्रिपल सीट आणि अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांचीही धरपकड केली जात होती. (नगर प्रतिनिधी)
सोशल मीडिया 'कलरफुल्ल'
दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सप्तरंगांची उधळण सुरू झाली होती. याचाच प्रत्यय गुरुवारी धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या जोरदार सेलिब्रेशनमध्येही दिसून आला. पाण्याचा अपव्यय टाळत, सुक्या रंगांची होळी खेळत भंडारेकरांनी धुळवड साजरी केली. जोशपूर्ण वातावरणात मात्र सामाजिक भान जपत जिल्हावासीयांनी रंगपंचमी साजरी केल्याचे दिसून आले. बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेला रंगपंचमीचा जल्लोष गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत दिसून आला. शिवाय, दुपारनंतर सर्वांचेच व्हॉट्स अँप विविध रंगांमध्ये न्हाऊन गेलेले दिसून आले.
स्वच्छतेबाबत उदासीनता
जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असताना यावर्षीची धुळवड साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन अनेक सामाजिक संस्था व शासनातर्फे करण्यात आले होते. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी करूनच रंगांची उधळण करण्यात आली. काहींनी केवळ टिळा लावून धुळवड साजरी केली. देशभरात स्वच्छता अभियान राबवले जात असून नागरिकांमध्ये मात्र स्वच्छतेबाबत उदासीनता दिसून आली. अनेक ठिकाणी कचराच कचरा अस्ताव्यस्त पसरलेले होते.
इको फ्रेंडली होळी
अनेक ठिकाणी पाणीटंचाई सुरू असताना होळी खेळण्याकरिता पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अनेक ठिकाणी कोरडी होळी खेळली गेली. त्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय टाळता आला. गावा गावात जल बचत करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने अनेकांनी कौतुक केले.