अग्निकांडाच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्हा रुग्णालयातील डायलिसीस सुविधा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:55+5:302021-01-15T04:29:55+5:30
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सुमारे सहा वर्षापूर्वी डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पहिल्या माळ्यावरील आयसीयू कक्षासमोर आणि ...
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सुमारे सहा वर्षापूर्वी डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पहिल्या माळ्यावरील आयसीयू कक्षासमोर आणि एसएनसीयू कक्षाला लागूनच हा कक्ष आहे. शनिवारी पहाटे एसएनसीयू कक्षात अग्नितांडव झाले. त्यात दहा चिमुकल्यांचा बळी गेला. तर सात जणांना वाचविण्यात यश आले. अग्निकांड झाल्यानंतर एक दिवस डायलिसीस कक्षातील सुविधा सुरू होती. परंतु अचानक दुसऱ्या दिवसापासून ही सुविधा बंद झाली. येथे एका दिवसात १६ व्यक्तींना डायलिसीस करण्याची सुविधा आहे. आता गत चार दिवसांपासून ही सुविधा बंद असल्याने किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोहाडी तालुक्यातील एका गावातील रुग्ण दर आठवड्याला येथे डायलिसीससाठी येतो. दोन वर्षापासून तो नियमित डायलिसीस करीत आहे. परंतु आता या अग्निकांडानंतर ही सुविधा बंद झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा शहरात दुसरीकडे कुठेही ही सुविधा नाही. त्यामुळे रुग्णांना आता नागपूरकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे अनेक रुग्ण येथून डायलिसीस सुविधेचा लाभ घेतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डायलिसीसची सुविधा तात्काळ सुरू करावी यासाठी अनेकांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. परंतु गुरुवारपर्यंत सुविधा सुरू झाली नव्हती.