आचारसंहितेत अडकलेली साडी रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळाली का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 03:38 PM2024-07-16T15:38:43+5:302024-07-16T15:40:15+5:30
Bhandara : पुढील आठवड्यात रेशनच्या सर्व साड्यांचे वाटप होण्याची आहे शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या आधी अंत्योदय रेशन कार्डधारकांना एक साडी भेट देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे वाटप थांबले होते. ते वाटप आता सुरू झाले असून, पुढील एक ते दोन आठवड्यांत सर्व साड्यांचे वाटप होईल, अशी शक्यता आहे.
राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर करण्यात आले होते. या धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रतिकुटुंब एका साडीचे मोफत वाटप करण्याची योजना सुरू केल्याची यापूर्वीच जाहीर झालेले आहे. या योजनेचा कालावधी २०२३ ते २०२८ असा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ग्राह्य धरून हा निर्णय शासनाने घेतला होता. दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या संख्येत वाढ किंवा घट होत असते.
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, नवी मुंबई ही नोडल संस्था म्हणून नेमण्यात आली आहे. साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येईल. दरम्यान, शासकीय गोदामात येणाऱ्या साठ्यांचे गड्ढे, तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणाऱ्या साड्यांच्या गठ्यांची नोंद ऑनलाइन पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे. साड्यांचे वाटप ई-पॉस मशीनद्वारेच करावे. साड्या वाटप करताना साड्या खराब होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा विविध सूचना पुरवठा विभा
दरवर्षी मिळेल एक साडी
साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येत आहे. सर्व लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमधून साडी वितरित करण्यात येईल. राज्य शासनाने दुकानाम निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रतिकुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत वाटप केली जाणार आहे.
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटुंब एक साडी मोफत वितरित करणार आहे. सदर साड्यांचा पुरवठा हा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी ते होळी २४ मार्च या कालावधीत करावयाचा होता. परंतु लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितामुळे साड्यांचे वाटप शासन पत्रान्वये तात्पुरत्या स्वरूपात प्रलंबित ठेवण्यात आले होते. जूनपासून या साड्यांचे वितरण करण्याबाबत शासनाकडून मंजूर मिळाली असून साड्याचे वाटप सुरू आहे.
- नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.
६६,१०४ अंत्योदय कार्डधारकांना मिळणार लाभ
जिल्ह्यातील ६६१०४ अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार असून, लवकरच उर्वरित साड्यांचे वाटप केले जाईल, असा विश्वास जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. वाटपाला सध्या सुरुवात झाली असल्याचेही सांगण्यात आले.
४९,०५० साड्यांचे वाटप लोकसभेआधी
जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ४९ हजार ५० लाभार्थी कुटुंबीयांस प्रतिकुटुंब एक साडी लोकसभाच्या आचारसंहितेपूर्वी वाटप करण्यात आले आहे. आता उर्वरित १७०५४ साड्यांचे वितरण लवकरच पूर्ण होणार आहे.
आचारसंहितेमुळे १७ लाख साड्यांचे वाटप लटकले
राज्य शासनाकडून लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप केले जाणार होते; परंतु लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागल्यामुळे साड्या वाटप थांबविण्यात आले आहे. जून महिन्यात साड्यांचे वाटप सुरू झाले असून, पुढील आठवड्यात सर्व साड्यांचे वाटप होण्याची शक्यता आहे.
लोकसभा आचारसंहितेमुळे १७ लाख शाळांचे वितरण लटकले होते. आचारसंहिता संपल्यानंतर शासन आदेशानुसार शाळांचे वाटप पॉश मशिनवर थम्प केल्यानंतर देण्यात यावे, असे आदेश मिळाले. त्यानंतर जिल्हा पुरवठा विभागातर्फे उर्वरित साड्यांचे वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.