डिझेल टँकर व कंटेनरला अपघातानंतर आग; एकाचा जळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 10:39 AM2023-04-28T10:39:50+5:302023-04-28T10:40:25+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील घटना : दुतर्फा २० किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प
भंडारा : मुंबई-कोलकाता या ५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर डिझेलचा टँकर आणि कंटेनरचा अपघात होऊन दोन्ही वाहने जळून खाक झाली. यात अपघातात एकाचा जळून मृत्यू झाला. भंडाऱ्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील भिलेवाडा ते पलाडीदरम्यान एआर पेट्रोलपंपाजवळ रात्री ७:४५ दरम्यान ही दुर्घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भिलेवाडा ते पलाडीदरम्यान महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील पुलावरून ही दोन्ही वाहने समोरासमोरून येताना टॅँकरला कंटेनरची मागून धडक दिली. यामुळे काही कळायच्या आत टँकर फुटून डिझेल बाहेर आले आणि दोन्ही वाहनांनी क्षणात पेट घेतला. यात कंटेनरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला.
आगीमध्ये दोन्ही वाहने पूर्णत: जळाल्याने वाहनांचे क्रमांक आणि मृताचे नाव वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही. आग एवढी भीषण होती की, दूरवर आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. ऐन पुलावरच ही घटना घडल्याने दुतर्फा सुमारे २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भंडारा आणि लाखनी येथून अग्निशामक वाहन पाचारण करून या आगीवर रात्री ९:३० वाजता नियंत्रण मिळविण्यात आले. घटना घडली तेव्हा जोराचा वारा सुटला होता. त्यामुळे आगीचे लोळ वाऱ्यासोबत पसरत असल्याने महामार्गावर भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, रात्री उशिरा वृत्त लिहीपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती असून, महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्न महामार्ग पोलिस करत आहे.