डिंपलची आत्महत्या नसून हत्याच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:05 PM2018-12-09T22:05:12+5:302018-12-09T22:05:59+5:30
आंतरराज्यीय विवाह करून संसार करीत असताना अचानक काल एका १९ वर्षीय महिलेचा मृतदेह राहत्या घरी गळफास लावतांना दिसला. मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : आंतरराज्यीय विवाह करून संसार करीत असताना अचानक काल एका १९ वर्षीय महिलेचा मृतदेह राहत्या घरी गळफास लावतांना दिसला. मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच आहे. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी साकोली पोलीस स्टेशन येथे दिली आहे. डिंपल मुन्ना कोसरे (१९) रा.जांभळी खांबा असे मृतक महिलेचे नाव आहे.
डिंपल व मुन्ना यांचे २०१६ ला आंतरजातीय विवाह केला होता. लग्नानंतर डिंपल पती मुलाच्या घरीच राहत होती. दोघांनाही दिड वर्षाचा मुलगा आहे. नेहमीप्रमाणे मुन्ना कामाला गेला होता व दुपारी घरी आला व शेतातून येतो म्हणून सांगून गेला. सायंकाळी घरी परत आल्यानंतर घराचे दार आतमधून बंद होते. खिडकीतून पाहिले असता डिंपल सिलींग फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे मुन्ना ते दार तोडून डिंपलला खाली उतरविले. मात्र तोपर्यंत डिंपलचा मृत्यू झाला. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले व त्यांनी डिंपलचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे आणले अशी माहिती पोलिसांना दिली.
मृत डिंपलचे वडील लाला जयराम बोंबर्डे रा.वडेगाव यांनी पोलिसात तक्रार दिली की, ‘मुन्ना कोसरे, उमराव कोसरे, सुशीला कोसरे, भोजराम कोसरे व सविता बावणे हे डिंपलला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास बाध्य केले’. लग्नानंतर मुलीच्या सारकडचे लोक मुलगी अनुसूचित जातीची असल्यामुळे वारंवार जातीवाचक शिवीगाळ करीत होते. त्यामुळे या त्रासाला कंटाळून माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
शवविच्छेदनानंतर डिंपलचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी जांभळी येथे नेण्यात आले. पोलिसांनी मृत डिंपलचे पती मुन्ना कोसरे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर भादंविच्या ४९८, ३०६ (३४), ३,२,५ अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी करीत आहेत.
मातृत्व हरपले
डिंपल व मुन्ना यांच्या वैवाहिक जीवनाला दोन वर्षे झाली. संसार सुरळीत सुरु होता. त्यानंतर या वैवाहिक जीवनात त्यांना एक मुलगा झाला. पार्थव असे या चिमुकल्याचे नाव आहे. आईच्या अकाली मृत्यूमुळे पार्थव वरील आईचे मातृत्वच हरपले आहे.
रिपब्लिकन सेनेचे निवेदन
डिंपलच्या मृत्यूची योग्य ती चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन रिपब्लीकन सेनेतर्फे पोलीस स्टेशन येथे कल्याण मेश्राम, विक्की राऊत, देवानंद इलमकर, आशीर्वाद वैद्ये, रुपेश तागडे, शामकुवर रंगारी, भावेश कोटांगले यांनी दिले आहे.