जिल्ह्यातील १०४४ शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापनास झाली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:39+5:302021-02-12T04:33:39+5:30
भंडारा : शासनाच्या आदेशानुसार पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाचवी ते दहावीच्या ...
भंडारा : शासनाच्या आदेशानुसार पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाचवी ते दहावीच्या एक हजार शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात झाली आहे. शासनाने कोरोना सूचनांचे पालन करून ज्ञानदान करण्याच्या दिलेल्या सूचना शिक्षण विभागातर्फे शाळांना दिल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती, शिक्षकांच्या कोरोना तपासण्या आदी माहिती ऑनलाईन करण्याच्या सूचना आहेत. काही ठिकाणी पालकांमध्ये अद्यापही कोरोनाची भीती दिसत आहे. मात्र अनेक शाळांनी कोरोना संसर्गासाठी प्रभावी उपाययोजना करून शाळांमध्ये अध्यापनास सुरुवात केली आहे. अद्यापही अनेक शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापन केले जात आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील ४८ शिक्षकांसह ९ शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित
जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पाच ते बारा पर्यंतच्या शाळा सुरू झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार शाळेतील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. यात जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या २७३५ पैकी २६२१ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली. यात १६ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तर आठवी ते दहावी पर्यंतच्या माध्यमिक २८८३ शिक्षकांची कोरोना चाचणी घेतली. यात ३२ शिक्षक व ९ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही नियमित थर्मामीटर, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात येत आहे.
उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमाण ६० टक्के
जिल्ह्यात पाचवी ते दहावीचे एकूण विद्यार्थी एक लाख ३५ हजार ९२६ इतकी आहे. त्यापैकी ८१ हजार ५३७ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. म्हणजेच एकूण ६० टक्के विद्यार्थ्यांची शाळेमध्ये उपस्थिती दिसून येत आहे. पाचवी ते आठवीचे एकूण विद्यार्थी ६९,६२० तर नववी ते बारावी पर्यंतचे एकूण ४१,०६३ विद्यार्थी उपस्थित राहात आहेत. म्हणजेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ही जास्त दिसून येत आहे. त्यामुळे अद्यापही लहान मुले असणाऱ्या पालकांमध्ये कोरोना विषयी भीती असल्याचे दिसून येते.